मालाड पश्चिमेकडील मालवणी गेट क्रमांक 8 परिसरातील एमएचबी कॉलनीत आज सकाळी भीषण दुर्घटना घडली. सकाळी सुमारे 9.45 वाजण्याच्या सुमारास एका घरात अचानक गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. या स्फोटात 6 ते 7 नागरिक गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. स्फोटाची तीव्रता इतकी होती की संपूर्ण परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.
स्फोटानंतर मोठा आवाज झाल्याने आसपासच्या नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिकांना माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या मदत पथकांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवले.
या दुर्घटनेत महिला, तरुण तसेच दोन वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. स्फोटात घरातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, परिसरातील इतर घरांनाही हादरा बसला.
आधार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेले जखमी
आधार हॉस्पिटलमध्ये खालील जखमींवर उपचार सुरू आहेत. डॉ. शाईमा शेख यांच्या देखरेखीखाली उपचार केले जात आहेत.
रुमा चौधरी (वय ४३)
अलिषा चौधरी (वय २०)
जुलेखा बानू (वय ४७)
आदिल शेख (वय २)
या सर्वांना भाजल्यामुळे जखमा झाल्या असून प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
केअर हॉस्पिटलमध्ये दाखल गंभीर जखमी
केअर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या काही जखमींची अवस्था अधिक गंभीर आहे. डॉ. सभाउद्दीन यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
विजय अशोक चौधरी (वय ४८) – हात, पाय व शरीर; ६० ते ७० टक्के भाजले
तोसिफ खान (वय २२) – हात, पाय व शरीर; सुमारे ४५ टक्के भाजले
अली कासिम (वय १८) – चेहरा, हात व डोके; सुमारे २५ टक्के भाजले
या जखमींना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती बारकाईने तपासली जात आहे.
अग्निशमन व पोलिसांची तत्काळ कारवाई
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आग नियंत्रणात आणण्यात आली असून परिसर सुरक्षित करण्यात आला आहे. गॅस गळतीमुळे स्फोट झाला की सिलिंडरमध्ये तांत्रिक बिघाड होता, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलिंडरच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी गॅस वापरताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.