गैरसमजातून नसबंदी शस्त्रक्रियेबाबत पुरुषांमध्ये असलेली उदासिनता दिसून येत आहे.  Pudhari News Network
मुंबई

Purush Nasbandi : राज्यात पुरुष नसबंदीचे प्रमाण नाममात्र, शहरांमध्ये अनास्था

गतवर्षी 7 हजार 311 पुरुष नसबंदी; विविध योजना राबवूनही प्रतिसाद मिळेना

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पुरुष नसबंदी साधी आणि सोपी असतानादेखील केवळ गैरसमजातून आजही नसबंदी करून घेण्यास पुरुष तयार होत नाहीत.

आजही कुटुंब नियोजनचा भार महिलेवर टाकला जात आहे. राज्यभरात गेल्या वर्षी फक्त 7 हजार 311 पुरुष नसबंदी झाल्या आहेत. तर महिलांच्या 3 लाख 984 नसबंदी शस्त्रक्रिया झाल्या आहेत. यावरून राज्यातील पुरुष नसबंदीचे प्रमाण नाममात्र असल्याचे समोर आले आहे.

चालू वर्षाची आकडेवारी अशी...

  • महिला नसबंदी- 3,00,984

  • पुरुष नसबंदी -7311

स्त्री-पुरुष समानतेचा जागर करणारा शहरी व ग्रामीण भागातील पुरुष कुटुंब नियोजनाची दोरी मात्र महिलांच्या हातात देऊन पुरुष दूरच राहत असल्याचे दिसते. मागील वर्षात राज्यात स्त्रियांच्या तुलनेत अवघ्या नाममात्र 11 टक्के पुरुषांनी नसबंदी केली आहे. यामधून शस्त्रक्रियेबाबत पुरुषांमध्ये असलेली उदासिनता दिसून येत आहे. राज्यातील आरोग्य विभागाला 50 हजार पुरुष शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यातील 7 हजार 311 पुरुषांची नसबंदी झाल्याने केवळ 11 टक्के उद्दिष्ट साध्य झाले आहे.

शस्त्रक्रियेबाबत उदासिनता

राज्याच्या शहरी भागातील अनास्था पाहून आरोग्य विभागाने जनजागृती मोहीम हाती घेण्याची गरज आहे. लहान कुटुंब, सुखी कुटुंब ही संकल्पना मागील दोन दशकांत सर्वदूर पोहोचली. यातून कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांनी गती पकडली. मात्र अनिष्ठ रुढी परंपरांना मानणार्‍या समाजात आजही शस्त्रक्रियेबाबत उदासिनता आहे. महिलांच्या तुलनेत पुरुषांची शस्त्रक्रिया सोपी असते. अवघ्या काही तासांत पेशंट पुन्हा कार्यरत होऊ शकतो. तरीसुध्दा याकडे दुर्लक्ष करून शस्त्रक्रियांसाठी महिलांनाच पुढे करण्यात येत असल्याचे समोर आले आहे.

पुरुषांना 1 हजार 100 रुपये अनुदान

पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया केवळ पाच ते दहा मिनिटांची असून, अतिशय सोयीस्कर आहे. शस्त्रक्रियेनंतर पुरुषांना 1 हजार 100 रुपये तातडीने अनुदान दिले जाते. याउलट महिलांना कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेनंतर आठ दिवस रुग्णालयात भरती राहावे लागते. असे असताना एप्रिल 2023 ते जानेवारी 2024 या कालावधीत राज्यातील 2 लाख 25 हजार 541 महिलांनी कुटुंब शस्त्रक्रिया करून घेतली. या तुलनेत पुरुषांचे प्रमाण अवघे 9 हजार 737 आहे. यामुळे शहरीसह ग्रामीण भागातील पुरुषांमध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेबाबत उदासिनता दिसून येते.

वर्षनिहाय पुरुष नसबंदीचे प्रमाण

  • 2018 -19 : 8698

  • 2019-20 : 8943

  • 2020-21 : 5276

  • 2021-22 : 7414

  • 2022-23 : 9511

  • 2023 -24 : 9337

  • 2024 -25 : 7311

शहरी भागात प्रतिसाद कमी

गेल्या पाच वर्षांत शहरी भागामध्ये पुरूष नसबंदीचे प्रमाण अत्यल्प राहिलेले आहे. या वर्षभरात महापालिका क्षेत्रात फक्त 5 टक्के शस्त्रक्रिया झाल्या आहेत. यामध्ये पुणे सर्वाधिक म्हणजेच 295 त्याखालोखाल मुंबईत 135 शस्त्रक्रिया झाल्या आहेत. तर 2018 -19 मध्ये 290, 2019-20 मध्ये 256, 2020-21मध्ये 187, 2021-22 मध्ये 599 , 2022-23 मध्ये 877, 2023 - जानेवारी 2024 मध्ये 517 शस्त्रक्रिया झाल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT