

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्यात गेल्या पाच वर्षांमध्ये नसबंदीचे प्रमाण घटले आहे. महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये नसबंदीबाबत जागरूकता नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. यावर्षी जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत महिलांच्या नसबंदीचे प्रमाण 23 टक्के, तर पुरुषांच्या नसबंदीचे प्रमाण केवळ 2 टक्के इतके आहे.
गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नसबंदी शस्त्रक्रियांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. त्यानंतर 2021-22 पासून प्रमाण वाढायला सुरुवात झाली आहे. पुरुष आणि महिलांचे प्रबोधन, नसबंदी शस्त्रक्रियांची मोफत शिबिरे अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून नसबंदीबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जात आहे.
राज्यात 2017-18 यावर्षी महिला नसबंदीच्या एकूण उद्दिष्टापैकी 80 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले. हेच प्रमाण 2018-19 मध्ये 76 टक्के, 2019-20 मध्ये 70 टक्के इतके होते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 2020-21 यावर्षी नसबंदीचे प्रमाण 40 टक्क्यांपर्यंत खाली आले.
संपूर्ण आरोग्य यंत्रणा या काळात कोव्हिडचा सामना करत होती. कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यावर 2021-22 मध्ये नसबंदीचे प्रमाण 53 टक्क्यांपर्यंत वाढले. यावर्षी जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत 23 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.
महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये नसबंदीचे प्रमाण कायमच लक्षणीयरीत्या कमी राहिले आहे. पुरुषांच्या नसबंदीचे प्रमाण 2017-18 मध्ये 23 टक्के, 2018-19 मध्ये 17 टक्के, 2019-20 मध्ये 18 टक्के, 2020-21 मध्ये 11 टक्के, 2021-22 मध्ये 15 टक्के तर यावर्षी पहिल्या नऊ महिन्यांमध्ये केवळ 2 टक्के पूर्ण झाले आहे.
नसबंदीचे एकूण प्रमाण :
वर्ष नसबंदीची टक्केवारी
2017-18 75
2018-19 71
2019-20 66
2020-21 37
2021-22 50
2022-23 21
(आजपर्यंत)