मुंबई : मालाड येथील सेक्स रॅकेटप्रकरणी फराह नावाच्या महिलेस मालाड पोलिसांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी तीन तरुणींची सुटका केली असून तिन्ही तरुणींना पोईसर येथील महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
फराहविरुद्ध पिटा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत ती सध्या पोलीस कोठडीत आहे. गेल्या काही दिवसांत मुंबई पोलिसांनी ऑनलाईन सेक्स रॅकेट चालविणाऱ्या टोळ्याविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहीमेतच मालाडच्या मालवणी परिसरात राहत असलेली फराह नावाची एक महिला काही तरुणींच्या मदतीने सेक्स रॅकेट चालवत असल्याचे समजले होते. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी बोगस ग्राहकाच्या मार्फत फराहशीसंपर्क साधला.
तिच्याकडे काही तरुणींची मागणी करण्यात आली. फोनवरुन आर्थिक व्यवहार ठरला. या व्यवहारानंतर तिने ग्राहकाला मालाडच्या एका एसआरए इमारतीमध्ये बोलाविले. रविवारी दुपारी बोगस ग्राहक संबंधित एसआरए इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये गेला. तिथे त्याचे फराहसोबत आर्थिक व्यवहार सुरु असताना मालाड पोलिसांनी तिथे छापा टाकला होता.
या फ्लॅटमधून तीन तरुणींची पोलिसांनी सुटका केली. वेगवेगळ्या ग्राहकांसोबत शारीरिक संबंध ठेवल्यास चांगला मोबदला तसेच पैशांचे आमिष फराहने दाखविले होते.