

मुंबई : राज्यातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे सार्वजनिक सुरक्षितता धोक्यात आली आहे. मुंबई, नागपूर, ठाणे, पुणे यासारख्या शहरांत गेल्या सहा वर्षांमध्ये भटक्या कुत्र्यांनी 30 लाखांहून अधिक लोकांना चावे घेतल्याची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. विशेष म्हणजे, 2024 मध्ये एकट्या मुंबईत 1 लाख 28 हजार कुत्र्यांनी चावा घेेतल्याच्या घटना घडल्या असून, रोज 1,369 लोकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची लेखी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे.
प्रमुख शहरांतील नागरिकांवर भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्यासंदर्भात विधान परिषदेतील शिवसेना (शिंदे सेना) आमदार कृपाल तुमाने यांनी तारांकित प्रश्न मांडला होता. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे 2014 व 2024 मध्ये भटक्या कुत्र्यांचे सर्वेक्षण केले असता, 2014 मध्ये 95 हजार 172, तर 2024 मध्ये 90 हजार 757 इतक्या भटक्या कुत्र्यांची नोंदणी करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात आठ निर्बीजीकरण केंद्रे सुरू करण्यात आली असून, या केंद्रांमध्ये 2025 मध्ये 4 लाख 46 हजार 203 कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तरात नमूद केले आहे.
पुणे शहरात जानेवारी ते नोव्हेंबर 2025 दरम्यान कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या 27 हजार 466 घटना घडल्या. त्याचबरोबर पनवेलमध्ये दोन वर्षांत 12 हजार 400, तर उरणमध्ये 2024-2025 मध्ये एकूण 2,442 तसेच 2025-2026 जानेवारीअखेर 2,792 कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटनांची नोंद झाली आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात गेल्यावर्षी डिसेंबर 2025 मध्ये दिवा येथील एका सहा वर्षीय मुलीचा रेबीजने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
राज्यात भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य शासनाने प्राणी जन्म नियंत्रण नियम, 2023 ची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, निर्बीजीकरण आणि लसीकरण कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच, शहरी व ग्रामीण भागात आवश्यक सुविधा उभारून श्वान निवारा केंद्रांची क्षमता वाढवली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि कृती आराखडा तयार करून हा कार्यक्रम त्वरित राबविण्याचे आदेश सर्व महापालिका, नगरपालिका व ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत, असेही उत्तरात स्पष्ट केले आहे.