Malad Waterlogging pudhari photo
मुंबई

Malad Waterlogging : मालाडमध्ये विकासकाच्या निष्काळजीपणामुळे रहिवाशांच्या घरांत पाणी

जीव मुठीत धरून काढली रात्र : विकासकावर कारवाई करण्याची रहिवाशांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास मुसळधार पाऊस कोसळला. पश्चिम उपनगरांतील मालाड कुरार व्हिलेज येथील कोकणीपाडा झोपडपट्टीत डीजीएस नावाच्या विकासकाच्या सुरू असलेल्या एसआरए प्रकल्पाच्या कामामुळे नागरिकांच्या घरांत कमरेपर्यंत पाणी शिरले. यामुळे नागरिकांना रात्रभर जीव मुठीत धरून जागरण करावे लागले.

एका स्थानिकाने रात्री १२.१५ वा. मदतीसाठी व्हिडीओ बनवून सोशल मिडियावर टाकला. परिणामी, अदानी वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून विजेचा पुरवठा बंद केल्याने मोठा अनर्थ टळला.

दिंडोशी विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्र.४३ अंतर्गत येणाऱ्या कोकणीपाडा पी नाॅर्थ विभागात विकासक डीजीएसच्या वस्तीमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती स्थानिक रहिवासी पप्पू पाल यांनी दिली. याविरोधात त्यांनी महापालिका, पोलीस आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण विभागाने कारवाई करण्याची मागणी केली आहे,

येथील वस्तीमधील घरात शिरलेल्या पाण्यात महिला, लहान मुले आणि वृद्धांचे हाल झाले. घरात शिरलेल्या पाण्यामुळे घरातील अन्नधान्य, कपडे, इलेक्ट्रॉनिक सामान पाण्यात बुडाले.विजेचे सॉकेट, वायरिंग पाण्यात असल्याने शॉर्ट सर्किट व करंट लागण्याचा धोका निर्माण झाला होता. तसेच रस्त्यावरही पाणी साचल्याने रात्री अपघात होण्याची शक्यता आहे.

डीजीएस बिल्डरच्या बांधकामामुळे नैसर्गिक निचरा व्यवस्था बंद झाली आहे. परिणामी, पावसाचे पाणी बाहेर न जाता थेट घरांमध्ये शिरत आहे. यामुळे पावसाळ्यात येथील वस्तीला पूराचा धोका निर्माण झाला आहे. ही फक्त पाण्याची समस्या नसून यात जीवितहानीचीही शक्यता आहे. दोषी विकासकावर कारवाई न झाल्यास भविष्यात एखादा अपघात किंवा शाॅक लागून जीव जाऊ शकतो, अशी भीती स्थानिक व्यक्त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT