Mumbai Encroachment : गरीबनगरची 600 कोटींची जमीन मोकळी

तिसऱ्या दिवशीही मोठ्या बंदोबस्तात कारवाई; आतापर्यंत 500 झोपड्यांवर बुलडोझर
Mumbai Encroachment
मुंबई : वांद्रे पूर्वेतील गरीबनगर येथील अनधिकृत झोपडपट्टीवरील कारवाईने बुधवारी हिंसक वळण घेतले होते. त्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढवत रेल्वे प्रशासनाने तिसऱ्या दिवशीही कारवाई सुरूच ठेवली. आतापर्यंत 85 टक्के तोडक कारवाई पूर्ण केल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली. मुंबई पोलिसांच्या सात पोलीस व्हॅन सकाळपासून या परिसरात सज्ज होत्या. जवळपास 200 अधिकचे पोलीस जवान बंदोबस्तासाठी ठेवण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. (छाया : दीपक साळवी)
Published on
Updated on

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पश्चिम रेल्वेने केलेल्या कारवाईत वांद्रे रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या गरीबनगरातील अनधिकृत झोपडपट्टीवर बुलडोझर फिरवण्यात येत आहे. मंगळवारी सुरू झालेल्या या मोहिमेत आतापर्यंत 500 झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्याने रेल्वेची सुमारे 600 कोटी रुपयांची जमीन ताब्यात घेण्यात आली. तीन दिवसांच्या कारवाईत 85 टक्के पाडकाम पूर्ण झाले असून ही कारवाई 23 मेपर्यंत चालणार आहे.

पाडण्यात आलेल्या 500 झोपड्यांपैकी 100 झोपड्या पुनर्वसनासाठी पात्र ठरल्या. झोपड्या पाडून मोकळ्या झालेल्या जमिनीचा उपयोग रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणासाठी केला जाईल. त्याचा फायदा लोकल तसेच लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी होऊ शकतो. तसेच ही जागा वांद्रे-कुर्ला संकुलाजवळ असल्याने तिचे महत्त्व अधिक आहे.

नागरिकांजवळ महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या कराच्या पावत्या, पाणी कराशी संबंधित कागदपत्रे आणि अधिकृत वीज कनेक्शन होते. दरम्यान, पाडकाम करण्यापूर्वी झोपडपट्टी रिकामी करण्यासाठी आम्हाला पुरेसा वेळ देण्यात आला नाही. थेट बुलडोझर झोपड्यांवर चढवण्यात आला, असा आरोप त्यांनी केला आहे.

  • या ठिकाणी अनेक मजली झोपड्या उभारण्यात आल्या होत्या. त्यातील काही हार्बर मार्गावर, तर काही रेल्वेच्या पुलाला लागून होत्या. आता त्या हटवण्यात आल्याने पश्चिम रेल्वेच्या विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news