Oshiwara bridge reconstruction Pudhari
मुंबई

Oshiwara bridge reconstruction: ओशिवरा नाल्यावर नवीन पूल उभा राहणार

मुंबई महानगरपालिका करणार 11 कोटी 98 लाख रुपयांचा खर्च

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: अखेर मालाड पश्चिम, लिंक रोड, ओशिवरा नाल्यावरील जुना पूल पाडून नवीन पूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी मुंबई महानगरपालिका 11 कोटी 98 लाख रुपये खर्च करणार आहे. या पुलासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली असून पावसाळा वगळून 18 महिन्यांत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

महानगरपालिकेच्या पुल विभागाने शहरातील सर्व पूलांचे सर्वेक्षण करण्यासाठी स्ट्रक्चरल सल्लागाराची नियुक्ती केली होती. या सर्वेक्षणामध्ये ओशिवरा नाल्यावरील पुलाचा सर्व्हे केला असता, हा पूल धोकादायक असल्याचे दिसून आले.

त्यानुसार सल्लागाराने वाहतूक पुलाचा स्लॅब हा धोकादायक असल्यामुळे स्लॅप तोडून पुनर्बांधणी करणे तसेच पुलाचे बिअरिंग बदलणे आदी कामे सुचवली. हा पूल पश्चिम उपनगरामध्ये लिंक रोडला जोडणारा महत्त्वाचा वाहतूक पूल असल्याकारणामुळे व पुलाची धोकादायक स्थिती लक्षात घेता पुन्हा एकदा स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार प्रतिष्ठित व्हीजेटीआय या संस्थेची नेमणूक करण्यात आली. या संस्थेने आपल्या अहवालात पूल धोकादायक असल्याचे सांगून त्याची पुनर्बांधणी करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने या पुलाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुलाच्या पुनर्बांधणीसाठी सुमारे 16 कोटी 30 लाख 95 हजार रुपये खर्च येईल, असे अपेक्षित धरून निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. यात पाच कंत्राटदारांनी भाग घेतला. यातील 26 टक्के कमी दराने काम करणाऱ्या कंत्राटदाराला या पूलाचे काम देण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यामुळे या पुलाचे काम आता 11 कोटी 98 लाख रुपयांमध्ये होणार आहे. पावसाळा वगळून 18 महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे टार्गेट कंत्राटदाराला देण्यात आले आहे. त्यामुळे हा नवा पूल जानेवारी 2028 पर्यंत वाहतुकीसाठी खुला होईल, असे सांगण्यात येत आहे.

पुलाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

  • कंत्राटदाराने कमी दराने काम करण्याची तयारी दर्शवल्यामुळे मुंबई महानगरपालिकेची

    4 कोटी रुपयांची बचत होणार असली तरी पुलाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण

    करण्यात आले आहे. पुलाच्या बांधकामासाठी महानगरपालिकेच्या तज्ञ अभियंत्यांनी अंदाजपत्रक तयार केलेले असताना या अंदाजपत्रापेक्षा कमी दरात कंत्राटदाराला हे

    काम कसे परवडणार, असा सवाल केला जात आहे. मात्र या कामावर मुंबई महानगरपालिका अभियंत्यांची नियुक्ती केली जाणार असल्यामुळे दर्जामध्ये

    कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे पूल विभागाच्या एका वरिष्ठ अभियंत्याने सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT