मालाड : मालाड-मालवणीतील सार्वजनिक खेळाच्या मैदानावर सुरू असलेल्या अनधिकृत टर्फ बांधकामाविरोधातील संघर्षाला अखेर मोठे यश मिळाले आहे. स्थानिक नागरिक, विविध संस्था आणि पक्षांच्या कार्यकर्त्यांसह सामाजिक कार्यकर्ते फिरोज शेख यांच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या व्यापक आंदोलनामुळे शासनाने टर्फच्या कामाला तातडीने स्थगिती दिली.
मालवणी गेट क्रमांक 8 वरील म्हाडाच्या खुल्या मैदानावर गुपचूप सुरू असलेल्या टर्फ बांधकामाला स्थानिकांनी वेळेत हरकत घेतली. फिरोज शेख यांनी या अनधिकृत कामाविरुद्ध मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, म्हाडा, महापालिका आणि संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारी देत सातत्याने पाठपुरावा केला.
या पाठपुराव्यानंतर त्यांना घाबरवण्यासाठी खोटे फौजदारी गुन्हे नोंदवण्याची धमकीही देण्यात आली होती. मात्र शेख यांनी धमक्यांना न जुमानता निर्भयपणे मैदान वाचवण्यासाठी संघर्ष सुरूच ठेवला. त्यांच्या धाडसामुळे स्थानिक तरुणांना प्रचंड पाठबळ मिळाले आणि आंदोलन अधिक प्रभावी बनले. विविध राजकीय पक्ष, संस्था, संघटनांनीही सक्रिय सहभाग घेतला.
स्थानिक नेत्या रिजवाना खान (मुस्लिम लीग) आणि सुनील गमरे रिपाई (अ) यांनीही म्हाडा कार्यालय, पोलीस ठाण्यात जाऊन निषेध केला, नागरिकांच्या वतीने ठाम मागण्या मांडल्याने प्रशासनाला तातडीने निर्णय घेण्यास भाग पाडले.
एक वीट ठेवली तरी कारवाई!
भविष्यात या मैदानावर एक वीट ठेवली, तरी एमआरटीपी कायद्यानुसार थेट कारवाई केली जाईल, असा इशारा म्हाडाने दिला आहे. मात्र, मैदान पूर्णपणे मुलांना, खेळाडूंना आणि नागरिकांना खुले होईपर्यंत लढा सुरू राहील, अशी ठाम भूमिका स्थानिकांनी घेतली आहे.