

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी एसआरएकडून धारावीतील रहिवाशांची माहिती संकलित करण्यात येत असून सेक्टर 1 ते 6 भागांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. यात 18 हजारांहून अधिक कुटुंबांनी सहभाग नोदवत कागदपत्र जमा केली आहेत.
या शिबिरांमध्ये कुटुंबप्रमुख उपलब्ध नसलेली अशी सुमारे 4 हजार 500 घरांची स्वतंत्रपणे नोंद घेण्यात आली आहे. घरांच्या भेटीसाठी विशेष पथके तयार करण्यात आली होती. यामुळे रहिवाशांचा देखील पुन्हा नव्याने नोंदणी करण्याचा ताण वाचल्याचे धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी सांगितले.
एनएमडीपीएल कॉल सेंटरमधूनही आठ हजरांहून अधिक रहिवाशांनी संपर्क साधण्यात आला आहे. काही ठिकाणी झालेल्या नाममात्र विरोधाच्या घटना वगळता ही शिबिरे सुरळीत पार पडली आहेत. सुरुवातीच्या दिवसांत सुमारे 3 हजार रहिवाशांनी सहभाग नोंदवला होता. आता ही संख्या 18 हजरांपेक्षा अधिक झाल्याचे कल्याणकर यांनी सांगितले.
कागदपत्रांची पडताळणी, घरांना क्रमांक देण्याची प्रक्रिया, घरोघरी जाऊन केलेलं सर्वेक्षण या प्रक्रियेमुळे प्रलंबित प्रकरणांची नोंदणी आता अधिक वेगाने पूर्ण होत आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.