मालाड : मालाड पूर्व परिसरातील लक्ष्मणनगर, शिवाजीनगर व बच्चानीनगर भागात फुटपाथवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत व्यवसाय व अतिक्रमणे वाढल्याने पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. नागरिकांना नाईलाजाने रस्त्यावरून चालावे लागत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी परिसरात जागोजागी बॅनर लावले आहेत.
‘फुटपाथ मोकळा करा, आम्हाला श्वास घ्यायला द्या’, ‘फुटपाथ हा पादचाऱ्यांचा हक्क आहे’, ‘फुटपाथवरील अतिक्रमण त्वरित हटवा’ अशा आशयाचे संदेश बॅनरवर लावण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेच्या ‘पादचारी प्रथम’ अभियानाची मालाडमध्ये प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
लक्ष्मणनगर परिसरातील जवळपास संपूर्ण फुटपाथवर दुकानदार व व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या परिसरात सेंट फ्रान्सिस शाळा, विदर्भ शाळा, आदर्श शाळा तसेच अनेक क्लासेस आहेत. येथे दहा ते बारा हजार विद्यार्थी आणि पालक ये-जा करतात. शाळा सुरू होण्याच्या व सुटण्याच्या वेळेत रस्त्याकडेला दुचाकी व रिक्षांचे पार्किंग होत असल्याने विद्यार्थी व पालकांना चालण्यासाठी जागा मिळत नसल्याची तक्रार आहे.
शिवाजीनगर परिसरातही दुकानदारांनी दुकानातील साहित्यव इतर वस्तू फुटपाथवर ठेवल्याने पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाकडून अतिक्रमण हटवण्यासाठी ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
३० ऑगस्ट रोजी एका वाहनाने दोन मुले, एक महिला व एका व्यक्तीला धडक दिल्याची घटना घडली. या दुर्घटनेत महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. या परिसरात अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने फुटपाथ तातडीने मोकळे करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.पी/उत्तर विभागाच्या अतिक्रमण विभागाची कारवाईची गाडी या परिसरात नियमितपणे येत नसल्याने अतिक्रमण करणाऱ्यांचे मनोबल वाढत असल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे.
आता नागरिकांनी लावलेल्या बॅनरची दखल महापालिका प्रशासन कितपत घेते व प्रत्यक्षात फुटपाथवरील अतिक्रमणे हटवून पादचाऱ्यांसाठी मार्ग मोकळा केला जातो का, याकडे मालाडकरांचे लक्ष लागले आहे.
नगरसेवक निवडणुकीवेळी नागरिकांना मालाडमध्ये फुटपाथ मोकळा करून दिला जाईल. नागरिकांना चालण्यासाठी रस्ता असतो याची पूर्ण सोय केली जाईल, असे म्हणणारे नगरसेवक झाल्यानंतर ते दिसेनासे झाले आहेत.रस्त्यांवरील खड्डे, मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी,हातगाड्या व मोठ्या प्रमाणात दुचाकी, रिक्षा, चारचाकी गाड्या पार्किंग केल्यामुळे रस्ता शिल्लक राहत नाही. अशा मोठ्या समस्यांकडे नगरसेवकांनी पाठ फिरवली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.