मुंबई : दहशत निर्माण करून नागरिकांना धमकावणे, मारहाण, खंडणी, जबरी चोरी, अमली पदार्थांची विक्री तसेच शस्त्रांचा धाक दाखवणाऱ्या १० सराईत गुन्हेगारांना मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्याच्या हद्दीतून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. उत्तर परिमंडळ-३ अंतर्गत पोलीस ठाण्यांनी केलेल्या प्रस्तावांनंतर कायदेशीर सुनावणीची प्रक्रिया पूर्ण करून ही कारवाई करण्यात आली.
मुंबई शहर व उपनगरांतील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करणे व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करणे, या उद्देशाने पोलिसांकडून सराईत गुन्हेगारांची माहिती संकलित करून त्यांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये परिसरात सातत्याने दहशतीचे वातावरण निर्माण करणारे आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे वारंवार करणारे १० जण आढळून आले.
या व्यक्तींच्या गुन्हेगारी स्वरुपाच्या कारवायांमुळे परिसरातील सर्वसामान्य नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी व व्यावसायिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे सार्वजनिक हिताच्या दृष्टीने त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करणे आवश्यक असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. संबंधित पोलीस ठाण्यांनी महाराष्ट्र पोलीस कायद्यातील तरतुदीनुसार संबंधित गुन्हेगारांचे हद्दपारीचे प्रस्ताव सादर केले.
टोळीप्रमुखासह दोघे हद्दपारमहाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अंतर्गत कुरार परिसरातील कार्तिक ऊर्फ कार्तिकेय दिनेशुकुमार पाठक (वय २३) व शैलेश अनिलकुमार गिरी (वय २१) यांच्यावरही हद्दपारीची कारवाई करण्यात आली.कार्तिक हा टोळीप्रमुख आहे.
आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई
हद्दपारीचे आदेश संबंधितांना बजावण्यात आले असून उत्तर परिमंडळ-३ अंतर्गत सर्व पोलीस ठाण्यांना सदर आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परिणामी, हद्दपार केलेली व्यक्ती आदेशाचे उल्लंघन करून मुंबई शहर किंवा मुंबई उपनगर जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करताना किंवा वास्तव्यास आढळल्यास तिच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार तातडीने कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
आठ जणांवर कलम ५६ अंतर्गत कारवाई
महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६(१)(अ)(ब) अंतर्गत आठ जणांना हद्दपार करण्यात आले. यामध्ये अमन उत्तम जयस्वाल (वय ३८), प्रफुल्ल युवराज आवाडे (वय ३७), अभिषेक महेंद्रप्रसाद सरोज ऊर्फ चचकाना भाई (वय २४), पंकज मारुती चाळके (वय ३७), महेश शिवराज स्वामी (वय २४), ऋषिकेश विकास हरमाळे ऊर्फ बुटक्या (वय २७), विजय हरिश्चंद्र भोईर (वय २४)व राणी रघुनाथ हरिजन (वय ५६) यांचा समावेश आहे.