Malad Construction Accident Pudhari
मुंबई

Malad Construction Accident: मालाडमध्ये बांधकामाच्या खड्ड्यात पडून ८ वर्षीय मुलाचा मृत्यू

सुरक्षेचा अभाव ठरला जीवघेणा; स्थानिकांचा संताप, बांधकाम व्यावसायिकाविरोधात कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

मालाड/कांदीवली : मालाड पूर्वेतील कुरार व्हिलेज येथे एका निर्माणाधीन इमारतीसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून दिव्यांश राजेश मौर्या (वय 8) या आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी रात्री आठच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.

बांधकाम व्यावसायिकाने सुरक्षेची कोणतेही नियम पाळले नसल्याने स्थानिकांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी कुरार पोलीस चौकीला घेराव घालत बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

येथील शांताराम तलावाजवळ माऊली साई कन्स्ट्रक्शनकडून हे इमारतीचे काम सुरू आहे. त्यांनी इमारतीच्या पायाभरणीसाठी हा खड्डा खोदला आहे. मात्र या खड्ड्याला कोणत्याच प्रकारे सुरक्षा भिंत किंवा बॅरिकेड्स लावलेले नव्हते. दिव्यांश हा जवळच्या झोपडपट्टीत राहत होता. गुरुवारी रात्री आठ वाजता तो येथे चेंडू खेळत होता. चेंडू खड्ड्यात पडला म्हणून तो चेंडू काढण्यासाठी खड्ड्यात गेला. मात्र खड्ड्यातील सांडपाण्याचा अंदाज न आल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला आहे.

दिव्यांश घरी न आल्याने आई-वडिलांनी त्याचा शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. शेवटी खड्ड्याजवळ येऊन त्यांनी मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात पाहणी केली असता दिव्यांश खड्ड्यात पडल्याचे दिसून आले. यानंतर कुरार पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी धाव घेत मुलाला बाहेर काढले मात्र मुलाचा मृत्यू झाला होता. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह पुढील तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी माऊली साई डेव्हलपर्सचे ठेकेदार दिनेश पटेल, अभियंता किशन व इतर संबंधितांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

झालेला अपघातात माऊली बिल्डर्स यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे की, मुख्य गेटवर सुरक्षा रक्षक असल्यामुळे बिल्डिंगच्या पाठीमागे कोणाला जाता येत नाही. मात्र काल गुढीपाडवा असल्याने कामावर कुणीही नव्हते त्यामुळे मुलगा तेथे गेला आणि अपघा झाला.

पोलीस चौकीला घेराव

शुक्रवारी सकाळी ही घटना समजल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करीत कुरार पोलीस चौकीला घेराव घातला. माऊली बिल्डर्स याच्या हलगर्जीपणामुळे आणि मालाड महानगरपालिका पी/ उत्तर बांधकाम विभागाचा हलगर्जीपणाचा आरोप केला. या ठिकाणी तत्काळ संरक्षण भिंतीची मागणी करीत माऊली बिल्डर्स याच्यावर आणि महानगरपालिका बांधकाम विभागाचे इंजिनिअर यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT