मुंबई : महेश पांचाळ
महालक्ष्मी, मुंबादेवीपाठोपाठ माहीम येथील शितलादेवीच्या दर्शनासाठी मुंबईकरांची बाराही महिने गर्दी असते. मुंबईच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपणारी माहिम येथील शितलादेवी मंदिर नवरात्रोत्सवात भक्तीच्या रंगात न्हाऊन निघते. कोळी बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराला अडीचशे ते तीनशे वर्षांची धार्मिक परंपरा आहे.
नवरात्रोत्सव कालावधीत नऊ दिवस देवीचा जागर, सकाळ-सायंकाळची आरती, सनई-चौघड्याचा मंगलध्वनी आणि धार्मिक विधींमुळे मंदिर परिसरात चैतन्य निर्माण झाले आहे. अष्टमीच्या दिवशी होणारा होम हा उत्सवातील विशेष धार्मिक विधी मानला जातो. यंदाही शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने देवीच्या दर्शनासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही पहिल्या दिवसापासूनच भाविकांची गर्दी झाली असून, श्रद्धा व परंपरेचा संगम या ठिकाणी अनुभवायला मिळत आहे.
संकटांपासून रक्षण करणारी देवी
शितलादेवीला दुर्गेचे एक रूप मानून भक्त तिची उपासना करतात. लोकपरंपरेत देवीचा संबंध आरोग्यरक्षणाशीही जोडला जातो. लहान मुलांचे आरोग्य, कुटुंबाचे कल्याण आणि संकटांपासून संरक्षण मिळावे, यासाठी भक्त देवीच्या चरणी प्रार्थना करतात. या मंदिराशी माहिम आणि मुंबई परिसरातील कोळी समाजाचे पिढ्यान्पिढ्यांचे नाते आहे. शुभकार्यापूर्वी देवीचे दर्शन घेणे, नवस बोलणे आणि मनोकामना पूर्ण झाल्यानंतर नवस फेडणे, अशी श्रद्धेची परंपरा आजही अनेक कुटुंबांत जपली जात आहे.
अष्टमीचा होम आणि सोन्याच्या मुखवट्याचे आकर्षण
नवरात्रोत्सवामध्ये सकाळी आणि सायंकाळी होणाऱ्या आरतीला विशेष महत्त्व असते. सनई-चौघड्याच्या मंगलध्वनीतील धार्मिक कार्यक्रमामुळे येथील वातावरण अधिक भक्तिमय होते. अष्टमीला होणाऱ्या होमात सहभागी होण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित राहतात. मंदिरातील देवीच्या मूर्तीला नवरात्रात सोन्याचा मुखवटा चढविण्याची परंपरा हे येथील आणखी एक वैशिष्ट्य आहे.
भक्तिभावाचे माहात्म्य
हे मंदिर आजच्या काळातही भाविकांना आपल्या धार्मिक व सांस्कृतिक मुळांशी जोडून ठेवत आहे. मंदिराचे महात्म्य केवळ त्याच्या प्राचीन परंपरेत नाही, तर पिढ्यान्पिढ्या जपल्या गेलेल्या भक्तिभावात आणि देवीवरील अढळ विश्वासात सामावलेले आहे.
चौलच्या देवीशी श्रद्धेचे नाते
माहिमच्या शितलादेवी मंदिराचे धार्मिक वैशिष्ट्य म्हणजे रायगड जिल्ह्यातील चौल येथील शितलादेवीशी जोडली जाणारी भाविकांची श्रद्धा. चौल येथे जाऊन देवीचे दर्शन घेणे शक्य नसलेल्या भाविकांनी माहिमच्या मंदिरात नवस केल्यास तो चौलच्या देवीपर्यंत पोहोचतो, अशी लोकमान्यता आहे. या श्रद्धेमुळे माहिमचे मंदिर व्यापक धार्मिक परंपरेचा भाग बनले आहे.