Raigad Local News : माणगाव नगर पंचायतीच्या विकासकामांवर प्रश्नचिन्ह

पाणीपुरवठा, गटारे, कचरा व्यवस्थापनासह अनेक कामांबाबत नागरिकांच्या तक्रारी; काही कामे सुरू
Mangaon City Development
Mangaon City Developmentpudhari photo
Published on: 
Updated on: 

माणगाव : सुनियोजित, सुंदर आणि हिरवेगार माणगाव उभारण्याचे स्वप्न माजी आमदार कै. अशोक साबळे यांनी पाहिले होते. मात्र, सध्या शहरातील विविध विकासकामांच्या सद्यस्थितीवरून नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पाणीपुरवठा योजनेतील विलंब, गटारांची समस्या, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि रखडलेली बांधकामे यामुळे शहराच्या विकासाचे नियोजन अधिक प्रभावी करण्याची मागणी होत आहे. दुसरीकडे, काही कामे सुरू असून काही प्रस्तावित, तर काही कामे ठेकेदार आणि न्यायालयीन प्रक्रियेमुळे रखडल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

शहराच्या पुढील २५ वर्षांच्या गरजा लक्षात घेऊन सुमारे ५१ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आली. नऊ ठिकाणी पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या असल्या, तरी खांदाड येथील जॅकवेलचे काम अपूर्ण असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. योजनेची कामे पूर्ण करून नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी होत आहे.

Mangaon City Development
Raigad Water Crisis : म्हसळा तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांची कामे रखडली

कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न

महामार्गाच्या दुतर्फा सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या गटारांमध्ये पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याची तक्रार आहे. आउटलेट नसल्यामुळे सांडपाणी साचत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सुमारे १५० कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजनेत पाच टक्के लोकवर्गणीचा प्रश्न उपस्थित झाल्याने अडथळे निर्माण झाल्याचे सांगितले जाते.

दररोज सुमारे दहा टन कचरा जमा होत असताना तीन टन क्षमतेची कचरा प्रक्रिया यंत्रणा अपुरी पडत असल्याचा प्रश्नही उपस्थित होत आहे. याशिवाय स्मशानभूमीतील विद्युत दाहिनी, शववाहिनी, स्वच्छतागृहांची दुरवस्था आणि स्वच्छतेच्या सुविधांबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नाट्यगृह, निजामपूर रोडवरील जिल्हा क्रीडा संकुल आणि नवीन नगरपरिषद इमारतीच्या कामांना गती देण्याची मागणी होत आहे.

सुमारे दीड कोटी रुपये खर्चाच्या नमो उद्यानाच्या जागेची निवड आणि नागरिकांना त्याचा कितपत लाभ मिळेल, याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बेकायदा बांधकामे आणि न्यायालयीन आदेशांच्या अंमलबजावणीबाबत पारदर्शकता राखण्याची अपेक्षाही नागरिक व्यक्त करीत आहेत.

या समस्यांबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष माळी यांनी सांगितले की, काही कामे लवकरच पूर्ण केली जातील, काही कामे प्रस्तावित आहेत, तर काही ठिकाणी ठेकेदार काम सोडून गेल्यामुळे अडथळे निर्माण झाले आहेत. काही प्रकरणे न्यायालयात असून काही कामे सुरू आहेत.

Mangaon City Development
Sahil Wakode Death Case : साहिलच्या मृत्यूप्रकरणी बाह्यसमितीच्या मागणीवर आंदोलक ठाम!

प्रशासनाच्या या स्पष्टीकरणामुळे रखडलेल्या कामांमागील काही कारणे समोर आली आहेत. मात्र, प्रत्येक कामाची सद्यस्थिती, पूर्णत्वाची अपेक्षित तारीख आणि नागरिकांना सुविधा कधी उपलब्ध होतील, याबाबत स्पष्ट माहिती देणे आवश्यक आहे.

‘सुंदर माणगाव’साठी समन्वयाची गरज

माणगाव हे मुंबई-गोवा महामार्गावरील महत्त्वाचे आणि वेगाने विकसित होणारे शहर आहे. त्यामुळे विकासकामांबाबत नागरिकांच्या तक्रारींची दखल घेणे आणि प्रशासनाने वस्तुस्थिती स्पष्ट करणे, या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. रखडलेल्या कामांचा आढावा, निधीचा योग्य वापर, कामांचा दर्जा आणि निश्चित कालमर्यादा यावर भर दिल्यास विकासाला गती मिळू शकते. नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेत मिळाव्यात, तर प्रशासनासमोरील अडचणीही पारदर्शकपणे समोर याव्यात. नागरिकांच्या अपेक्षा आणि प्रशासनाचे प्रयत्न यांचा समन्वय साधूनच ‘सुंदर माणगाव’चे स्वप्न साकार होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news