मुंबई : दहा कोटी रुपयांची खंडणी देण्यासाठी वारंवार धमक्या देऊनही सराफ व्यावसायिकाने दाद न दिल्याने माहीममध्ये पी. सी. जैन ज्वेलर्स दुकानावर बुधवारी गोळीबार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले असून, या गुंडांनी दहशत पसरवण्यासाठी आपला लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंध असल्याचेही सराफांना सांगितले.
दुकानाचे मालक भरत मेघराज जैन (४५) आणि कर्मचारी नामदेव गुरव हे गोळीबाराच्या वेळी दुकानातच होते. सायंकाळी साडेसातच्या सुमारास दुचाकीवरून दोन तरुण दुकानाजवळ आले. मागे बसलेल्या तरुणाने पिस्तूल काढून दुकानाच्या दिशेने दोन ते तीन गोळ्या झाडल्या. त्यामुळे दर्शनी भागाची काच फुटली.
महिनाभरात तीन वेळा धमकी
भरत जैन यांना १८ ऑक्टोबर रोजी पहिल्यांदा अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देणारा संदेश पाठविण्यात आला. २४ ऑक्टोबर रोजी पुन्हा दोन फोन आले. मात्र, त्यांनी फोन स्वीकारले नाहीत. त्यानंतर ३१ ऑक्टोबर रोजी पुन्हा धमकीचा संदेश आला.
यामध्ये दहा कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. पैसे न दिल्यास गोळ्या घालून ठार मारण्याचा इशारा देण्यात आला होता. तुमच्याकडे झेड प्लस सुरक्षा असली तरी पैसे द्यावेच लागतील, असा संदेशही पाठविण्यात आला होता. सुरुवातीला हे संदेश फसवणुकीचा प्रकार असावा, असे समजून जैन यांनी दुर्लक्ष केले.
बिश्नोई टोळीचा प्रत्यक्ष संबंध तपासणार
या प्रकरणात धमकी देणाऱ्यांनी लॉरेन्स बिश्नोई टोळीचे नाव घेतल्याने पोलिसांनी सर्व शक्यता तपासण्यास सुरुवात केली आहे. धमकीचे संदेश पाठविणारे आणि प्रत्यक्ष गोळीबार करणारे एकच आहेत का, त्यांना कोणी मदत केली आणि या घटनेमागे खरोखरच बिश्नोई टोळीचा संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे. माहीम पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके आरोपींचा शोध घेत आहेत.
हल्लेखोरांचा शोध घेण्याचे आव्हान
गोळीबार करणारे दोन्ही तरुण अंदाजे वीस ते पंचवीस वर्षांचे असल्याचे तक्रारदाराने पोलिसांना सांगितले. दुचाकी चालवणाऱ्या तरुणाने काळे जॅकेट, काळी पँट आणि चेहऱ्यावर मास्क घातला होता. मागे बसलेल्या तरुणानेही काळे जॅकेट आणि निळी जीन्स परिधान केली होती. दोघांनीही चेहरा लपविण्यासाठी हेल्मेट किंवा मास्कचा वापर केला होता. हल्लेखोरांनी वापरलेल्या दुचाकीवर बनावट नंबरप्लेट लावल्याचा संशय आहे. हल्लेखोरांनी वांद्रे स्थानकाजवळ दुचाकी सोडली आणि तेथून पलायन केले. परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासून हल्लेखोरांचा मार्ग शोधला जात आहे.