मुंबई ः महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या निर्मितीशी संबंधित असलेली एक फाईल मंत्रालयातून गहाळ झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात अज्ञातावर महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर चौकशी सुरू करण्यात आल्याचे मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले.
नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस ही फाईल गहाळ झाली होती. त्यानंतर माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे वरिष्ठ सहाय्यक संचालक सागर कांबळे यांनी मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात औपचारिक तक्रार दाखल केली होती.
ही फाईल मंत्रालयातील तळमजल्यावरील कार्यालयात ठेवण्यात आली होती. मात्र ती त्याठिकाणी आढळली नाही. त्याऐवजी, या फाइलची छायाप्रत तेथे ठेवण्यात आली होती. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सागर कांबळे यांना सांगितले की त्यांना मूळ फाईलबद्दल माहिती नाही. ते फोटोकॉपी केलेल्या फाइलवर काम करत आहेत. असे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. 1जानेवारी 2017 ते 31 मार्च 2020 दरम्यानची काही मूळ कागदपत्रे या फाईलमध्ये होती, असेही तक्रारीत म्हटले आहे.