

मुंबई : मुंबईचा महापौर मराठी होणार का ? यावर भाजपाने महापौर हिंदूच होणार, असे ठामपणे सांगितले होते. परंतु मराठी एकीकरण समितीने केलेली निदर्शने व मराठी मुंबईकरांच्या तीव्र नाराजीमुळे भाजपाने आपली भूमिका बदलली असून मुंबईचा महापौर मराठीच असेल, असे आता जाहीर केले आहे.
मुंबईचा महापौर मराठी होणार का, असा प्रश्न काही दिवसांपूर्वी भाजपाचे वरिष्ठ नेते पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांना विचारण्यात आला. त्यावर मुंबईचा महापौर हिंदूच असेल असे शेलार यांनी जाहीर केले आणि मराठी महापौर होणार असे म्हणणे टाळले होते. त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटताच शेलार यांनी आपली भूमिका बदलली. एका युट्युब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शेलार यांनी मराठीच महापौर होणार असे सांगितले. यावर आपण हिंदू महापौर होणार असे बोलला होतात असा प्रश्न केला असता मराठी हिंदू नाही का, असा सवाल करत शेलार यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असल्यामुळे एकगठ्ठा मराठी मते शिवसेना-मनसे युतीकडे जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महापौर मराठी नव्हे, हिंदू असेल, ही भूमिका शेलारांनी कायम ठेवल्यास, मराठी माणूस नाराज होण्याची शक्यता असल्याने भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी नाराजीही व्यक्त केली होती. त्यामुळे शेलार यांना महापौर हिंदू असेल, ही भूमिका बदलत महापौर मराठी असेल असे जाहीर करणे भाग पडले, असे सांगितले जाते.
भाजपामध्ये मराठीसह उत्तर भारतीय, गुजराती व अन्य राज्यातील नागरिकांना मुंबई महानगरपालिकेमध्ये उमेदवारी देण्यात येते. फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये सुमारे 50 टक्के 40 परप्रांतीय नगरसेवक निवडून आले होते. यावेळीही पुन्हा त्यांच्यासह अन्य परप्रांतीय पदाधिकाऱ्याला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईचा महापौर अमराठी झाला तर नवल वाटायला नको, असे जाणकारांना वाटते.