Maharashtra Employment Pudhari
मुंबई

Maharashtra Employment: 30 लाख युवकांना रोजगाराची मोठी संधी; राज्य सरकारची विशेष योजना जाहीर

कौशल्यविकास, परदेशी नोकऱ्या आणि आधुनिक प्रशिक्षणावर भर; मंत्री लोढा यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढील दोन वर्षांत 30 लाख युवकांना रोजगार आणि उद्योजकतेच्या नव्या संधी निर्माण होतील, असा दावा कौशल्यविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केला आहे.

सदस्य विक्रांत पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. लोढा म्हणाले, कौशल्यविकास क्षेत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यात मॉडेल करिअर सेंटरच्या माध्यमातून 2025-26 या वर्षात 1 लाख 12 हजारांवर युवकांना वैयक्तिक मार्गदर्शन करण्यात आले आहे. राज्यातील युवकांना परदेशात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मुंबई विद्यापीठात स्वामी विवेकानंद कौशल्यविकास इंटरनॅशनल ॲकॅडमी सुरू करण्यात आली आहे.

राज्यात आणखी सहा ठिकाणी अशा ॲकॅडमी सुरू करण्यात आल्या असून,

त्यामध्ये विविध परदेशी भाषांचे प्रशिक्षण दिले जात आहे. ईव्ही तंत्रज्ञान, रोबोटिक्स आणि ॲडव्हान्स वेल्डिंगसारख्या आधुनिक कौशल्यांचेही प्रशिक्षण दिले जात आहे. परदेशात रोजगारासाठी जाणाऱ्या युवकांची खासगी एजन्सीजकडून फसवणूक होऊ नये, यासाठी राज्य शासनामार्फत परकीय कंपन्यांशी कौशल्यविकास विभागामार्फत थेट समन्वय साधून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. आयटीआय आणि उद्योग क्षेत्रात समन्वय साधून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात असल्याचेही मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले.

राज्यातील आयटीआयमध्ये इंडस्ट्रियल मॅनेजमेंट कमिटी गठित करून यामध्ये 3 हजार 700 ट्रस्टींची नियुक्ती करण्यात आली आहे. उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, चार्टर्ड अकाऊंटंट आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. तसेच, आयटीआयमध्ये टेक्निकल डायरेक्टरची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही मंत्री लोढा यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT