Maharashtra UK Investment Partnership Pudhari
मुंबई

Maharashtra UK Investment Partnership: महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी उत्तम वातावरण; फडणवीस यांचे यूकेच्या उद्योजकांना आवाहन

उद्योगांच्या गुंतवणूक परिसंस्था निर्मितीत महाराष्ट्र सर्वांत आघाडीवर - मुख्यमंत्री फडणवीस

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: कौशल्य, भांडवल आणि तंत्रज्ञानाची सांगड घालणाऱ्या ठोस गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रात उत्कृष्ट परिसंस्था कार्यरत आहे. सर्वच क्षेत्रांतील उद्योगांच्या गुंतवणुकीसाठी असलेल्या परिसंस्थेच्या निर्मितीत महाराष्ट्र सर्वांत आघाडीवर आहे, या शब्दांत महाराष्ट्राचे महत्त्व अधोरेखित करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युनायटेड किंगडममधील संस्था आणि उद्योजकांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.

हॉटेल ताज पॅलेस येथे आयोजित महाराष्ट्र-यूके भागीदारी शुभारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अनबलगन, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजेश गवांदे, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, युनायटेड किंगडमचे व्यवसाय, नवोन्मेष, विज्ञान आणि व्यापार राज्य सचिव जोनाथन रेनॉल्ड्स उपस्थित होते.

यूकेच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळासोबत झालेल्या द्विपक्षीय चर्चांनंतर विविध महत्त्वाच्या क्षेत्रांतील सहकार्य वाढविण्यासाठी महाराष्ट्र आणि यूकेदरम्यान झालेल्या सामंजस्य कराराचे आदान प्रदान करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुंतवणूकदारांचे प्रकल्प वेगाने पुढे नेण्यासाठी ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ व्यासपीठाच्या माध्यमातून सर्व संबंधित यंत्रणांशी तातडीने समन्वय साधला जाणार असल्याचे सांगितले.

जागतिक विद्यापीठे येणार

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यभरातील कुशल मनुष्यबळ, सक्षम औद्योगिक समूह आणि जागतिक ग्राहकांना सेवा देणाऱ्या अनुभवी भागीदारांचे मजबूत जाळे ही महाराष्ट्राची ताकद आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे परदेशी विद्यापीठांना महाराष्ट्रात कॅम्पस सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे.

‘युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टल’, ‘युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क’ आणि ‘युनिव्हर्सिटी ऑफ ॲबर्डिन’ यांसारखी जागतिक विद्यापीठे महाराष्ट्रात येत आहेत. महाराष्ट्र-यूके भागीदारीमुळे महाराष्ट्रातील स्थानिक उत्पादक, अन्नप्रक्रिया उद्योग, तंत्रज्ञान कंपन्या आणि लघुउद्योजकांना ब्रिटनमध्ये नव्या बाजारपेठा व ग्राहक मिळविण्याची संधी उपलब्ध होईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

राजकीय स्‍थैर्यामुळे महाराष्‍ट्राची निवड

राज्य सचिव जोनाथन रेनॉल्ड्स म्हणाले, यूकेच्या ज्या कंपन्या भारतीय बाजारपेठेत प्रवेश करू इच्छितात, त्यांच्यासाठी महाराष्ट्र हे सर्वात नैसर्गिक आणि योग्य ठिकाण आहे. या राज्याची निवड त्याच्या स्पष्ट आर्थिक ताकदीमुळे, राजकीय स्थैर्य आणि नेतृत्वामुळे केली आहे. राज्याची अर्थव्यवस्था ही युरोपमधील नॉर्वे देशापेक्षाही मोठी आहे.

महाराष्ट्रात केवळ एका कागदावर स्वाक्षरी करण्यासाठी आलेलो नाही, तर आम्हाला प्रत्यक्ष परिणाम आणि यश हवे आहे. दोन्ही बाजूंच्या लोकांनी एकत्र येऊन हे काम पुढे न्यावे आणि दोन्ही देशांच्या प्रगतीला गती द्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी यूकेमधील स्कॉटलंडचे पर्यावरण, अन्न आणि ग्रामीण व्यवहार सचिव डेम अँज्युला ईगल, राज्य सचिव डग्लस अलेक्झांडर, ईयू आणि आंतरराष्ट्रीय व्यापारचे संचालक सोफी ब्राईस, दक्षिण आशियासाठी यूकेचे उप-व्यापार आयुक्त हरशबीर संघा, इंग्लंडचे दक्षिण आशियासाठी व्यापार आयुक्त आणि पश्चिम भारतासाठी ब्रिटनचे उप-उच्चायुक्त हरजिंदर कांग, महापौर आदी उपस्थित होते.

स्‍वच्‍छ ऊर्जा प्रकल्‍पांना मोठा वाव : मुख्‍यमंत्री

राज्यात उभारण्यात येणाऱ्या एज्युसिटी, मेडिसिटी आणि एआय इनोव्हेशन सिटीमुळे जागतिक दर्जाचे संशोधन, संस्था आणि प्रतिभा एकत्र येतील. महाराष्ट्रात औद्योगिक कार्बन उत्सर्जन कमी करणे, ऊर्जा कार्यक्षमता, पाणी व्यवस्थापन, वाहतूक आणि साधनसंपत्तीचे पुनर्नवीकरण यांसारख्या स्वच्छ ऊर्जा प्रकल्पांना मोठा वाव आहे. जागतिक कंपन्यांना त्यांची ‘ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स’ आणि तंत्रज्ञान संशोधन केंद्रे महाराष्ट्रात उभारण्यासाठी राज्य शासन पूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT