

मुंबई: वरळी कोळीवाडा समुद्र किनारा अस्वच्छते बाबत मुंबई महापालिका सभागृहात जोरदार आवाज उठवण्यात आला होता. याची दखल घेत मुंबई महापालिकेने वरळी कोळीवाडा समुद्र किनारा स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी १ कोटी ५२ लाख रुपये खर्च येणार आहे.
मुंबई महानगरपालिकेतर्फे जुहू, गिरगाव आदीसह प्रमुख चौपाटी स्वच्छ केल्या जात असताना, कोळीवाड्यालगतच्या समुद्र किनाऱ्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप महिनाभरापूर्वी महापालिका सभागृहात सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला होता.
यावेळी नगरसेवकांनी कोळीवाडा लगतचे समुद्रकिनारे मुंबईत येत नाहीत का, असा सवाल केला होता. याची दखल घेत मुंबई महानगरपालिकेने कोळीवाड्यांच्या लगत असलेल्या समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आहे.
वरळी कोळी हा गेल्या काही वर्षांपासून त्याच्या बकालपणामुळे ओळखला जात आहे. कोळीवाडालगत असलेल्या निवासी परिसरालाही त्याची झळ बसलेली आहे.
मुंबई शहराच्या सौंदर्यालाही त्यामुळे ग्रहण लागले असल्याची नाराही वेळोवेळी नगरसेवकांकडून व्यक्त करण्यात आली असून पालिका प्रशासनावर त्यांनी ताशेरेही ओढले आहेत.
मुंबईतील बहुतेक समुद्र किनारे ही प्रमुख पर्यटन स्थळे आहेत. परंतु काही समुद्र किनाऱ्यावर मासेमारी व्यवसाय प्रामुख्याने करण्यात येतो. यात खार, वेसावे, मढ, कुलाबा माहीम, वरळी आदी प्रमुख चौपट्यांचा समावेश आहे. कोळीवाड्या लगतच्या किनारपट्टीवर मासेमारी व्यवसाय, समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठी येणारे पर्यटक, यामुळे येथे कचऱ्याचे प्रमाण वाढते.
त्या समुद्राच्या लाटांसोबत किनाऱ्यावर येणाऱ्या कचऱ्यामुळे संपूर्ण किनारा अस्वच्छ होतो. त्यामुळे पहिल्या टप्प्यात वरळी कोळीवाडा येथील समुद्रकिनारा स्वच्छ करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. यापूर्वीही वरळी कोळीवाडा किनारा स्वच्छ ठेवण्यासाठी अनेकदा अभियान राबविण्यात आले आहे.
नुकतीच सप्टेंबर २०२६ मध्ये राजकीय नेते आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत येथे विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली, ज्यामध्ये काही दिवसांत ५० टनांपेक्षा जास्त कचरा हटवला. या भागात रात्रीच्या वेळी घंटागाडीची व्यवस्था आणि २४ तास स्वच्छता मोहीम राबवून हा किनारा चकाचक ठेवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
साडेतीन किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा
वरळी कोळीवाडा समुद्र किनाऱ्याची लांबी ३.५ कि.मी. आणि रूंदी ३०० मी. आहे. या समुद्र किनाऱ्यावर जमा होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. यात मुख्यत्वे गाळ, माती, डेब्रीज मिश्रीत कचरा प्रमाण वाढल्याने येते जमा होणाऱ्या कचऱ्याची नियमितपणे साफसफाई करावी लागते.
येथे जमा होणारा कचरा मनुष्यबळ, स्कीड स्टीयर लोडर मशीन व ई-ऑटो वाहनांद्वारे जमा करून पुढील विल्हेवाट लावण्याकरिता क्षेपणभूमी येथे वाहुन नेण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.