Foreign Direct Investment India
मुंबई/नवी दिल्ली :
उत्पादन आणि सेवा क्षेत्रात आर्थिक वर्ष 2024- 25 मध्ये 81.04 अब्ज डॉलरची थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय) झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत त्यात 14 टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, देशात झालेल्या एकूण विदेशी गुंतवणुकीपैकी 39 टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहे.
आर्थिक वर्ष 2023- 24 मध्ये 71.28 अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक झाली होती. तर, 2013-14 मध्ये विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण 36.05 टक्के होते. गत अकरा वर्षांत विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण दुपटीहून अधिक वाढले आहे.
मार्चअखेरीस संपलेल्या आर्थिक वर्षात सेवा क्षेत्राने मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित केली. एकूण गुंतवणुकीपैकी 19 टक्के वाटा सेवा क्षेत्राचा असून, खालोखाल संगणकीय आज्ञावली (सॉफ्टवेअर) आणि संगणकाच्या सुट्या भागाचा (हार्डवेअर) क्रमांक लागतो. या क्षेत्राने 16 टक्के गुंतवणूक आकर्षित केली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने बुधवारी (दि.28) ही माहिती जाहीर केली.
सेवा क्षेत्रातील विदेशी गुंतवणूक 40.77 टक्क्यांनी वाढून 9.35 अब्ज डॉलरवर गेली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत 6.64 अब्ज डॉलरची गुंतवणूक आकर्षित झाली होती. उत्पादन क्षेत्रातील गुंतवणूक 18 टक्क्यांनी वाढून 19.04 अब्ज डॉलरवर गेली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 16.12 अब्ज डॉलरची गुंतवणूक उत्पादन क्षेत्रात झाली होती. आलेल्या एकूण गुंतवणुकीपैकी 31.59 अब्ज डॉलरची (39 टक्के) गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. खालोखाल कर्नाटक (13 टक्के) आणि दिल्लीचा (12 टक्के) क्रमांक लागतो.
देशात झालेल्या विदेशी गुंतवणुकीत सिंगापूरचा वाटा 30 टक्के आहे. खालोखाल मॉरिशस 17 आणि अमेरिकेचा वाटा 11 टक्के आहे. आर्थिक वर्ष 2013-14 मध्ये देशात 89 देशांमधून गुंतवणुकीचा ओघ येत होता. त्यात 2024-25 मध्ये 112 पर्यंत वाढ झाली आहे. गेल्या दहा वर्षांत विदेशी गुंतवणुकीची मर्यादा वाढवली आहे. त्यात संरक्षण, विमा, पेन्शन, बांधकाम, नागरी विमान वाहतूक, किरकोळ व्यापार अशी विविध क्षेत्रं विदेशी कंपन्यांसाठी खुली करण्यात आली आहेत.
गत पंचवीस वर्षांत देशात 1 हजार 72 अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली आहे. त्यापैकी 748.78 अब्ज डॉलरची गुंतवणूक 2014 ते 2025 या कालावधीत झाली आहे.
केंद्र सरकारने 2019 ते 2024 या कालावधीत कोळसा खाण, कंत्राटी उत्पादन, विमा क्षेत्रासाठी विदेशी गुंतवणुकीला शंभर टक्के मुभा दिली आहे.