Jaykumar Gore File Photo
मुंबई

Jaykumar Gore : भूमिहीन लाभार्थ्यांना घरासाठी जागा देण्यात महाराष्ट्र देशात अव्वल

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा दावा; राज्यात पावणेदोन लाख भूमिहीनांना दिली जागा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्यात 2 लाख 32 हजार 637 लाभार्थ्यांपैकी 1 लाख 75 हजार 423 भूमिहीन लाभार्थ्यांना घरासाठी जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे भूमिहीनांना घरासाठी जमीन उपलब्ध करून देणारा महाराष्ट्र हा देशात पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केला.

ग्रामीण भागातील गरिबांना हक्काचे घर देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमधून घरकुलाचा लाभ मिळत नसल्याबाबत विधान परिषदेत आमदार सतीश चव्हाण यांनी प्रश्न मांडला होता. त्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री जयकुमार यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, बेघरांना घर देताना भूमिहीन लाभार्थ्यांनाही घर मिळावे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र यांची भूमिका आहे.

सरकारने या लाभार्थ्यांसाठी विविध योजनांद्वारे जमीन उपलब्ध करून दिली आहे. त्यामध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजनेच्या अंतर्गत घरकुलासाठी जमीन खरेदीसाठी दिले जाणारे अनुदान पूर्वी 50 हजार रुपये होते, ते वाढवून 1 लाख रुपये करण्यात आले आहे. या योजनेतून सुमारे 4,838 लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे.

तसेच 40,485 लाभार्थ्यांना शासकीय जमीन विनामूल्य देण्यात आली असून 16 हजार 426 लाभार्थ्यांची अतिक्रमणे नियमित करण्यात आली. त्याचबरोबर संमतीपत्र, दानपत्र आणि भाडेपट्टा या माध्यमांतून सुमारे 1 लाख 13 हजार लाभार्थ्यांना जमीन देण्यात आली आहे. राज्यात अजून 57,414 लाभार्थ्यांना जमीन उपलब्ध करून देणे बाकी आहे. सरकारकडून या लाभार्थ्यांनाही लवकरात लवकर जमीन उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती मंत्री गोरे यांनी दिली.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 12,202 पात्र भूमिहीन लाभार्थी आहेत. त्यापैकी 7,817 जणांना जमीन देण्यात आली असून 4,385 लाभार्थ्यांना अजून जमीन देणे बाकी आहे. येथील ग्रामपंचायतीने गायरान जमिनीतून जागा देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला होता, मात्र त्यामध्ये त्रुटी असल्याने तो प्रस्ताव परत पाठवण्यात आला आहे.

हा प्रस्ताव दुरुस्त करून पुन्हा पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही गोरे म्हणाले. तसेच लाभार्थ्यांना लवकरात लवकर जमीन उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून शक्य तितक्या लवकर प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असेही मंत्री गोरे यांनी स्पष्ट केले.

अनुदानात वाढ करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा

राज्यात मागील सात ते आठ महिन्यांत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत चार लाख घरांचे बांधकाम पूर्ण झाले असल्याची माहिती मंत्री गोरे यांनी दिली. या घरकुलासाठी केंद्राकडून मिळणाऱ्या अनुदानात राज्य शासनाने अतिरिक्त 50 हजार रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे राज्यात एका घरकुलासाठी 2 लाख 10 हजार रुपयांचे अनुदान उपलब्ध होत आहे. दरम्यान, बांधकाम साहित्यांच्या किमती वाढल्याने घरकुलाच्या अनुदानात वाढ करण्याची होत असलेली मागणी लक्षात घेऊन हे अनुदान वाढवून मिळण्याबाबत केंद्र शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. त्याबाबत पाठपुरावा सुरू असल्याचेही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT