Pavitra Portal Teacher Recruitment Pudhari
मुंबई

Pavitra Portal Teacher Recruitment: पवित्र पोर्टलमधून क्रीडा शिक्षकांची चार हजार ८६० पदे गायब!

शासन निर्णयातील मंजूर पदे भरतीत दाखविलीच नाहीत : बीपीएड उमेदवारांमध्ये संताप

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: राज्यात तब्बल ३० हजार २०९ शिक्षक पदांची मेगा भरती सुरू असताना क्रीडा शिक्षकांच्या चार हजार ८६० मंजूर पदांना मात्र पवित्र पोर्टलच्या भरती प्रक्रियेतूनच वगळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या २ जानेवारी २०२६च्या शासन निर्णयात राज्यातील ४ हजार ८६० समूह साधन केंद्रांवर प्रत्येकी एक याप्रमाणे ४ हजार ८६० केंद्रस्तरीय विशेष शिक्षक (क्रीडा) पदांचा स्पष्ट उल्लेख आहे.

प्रत्यक्ष भरतीच्या जाहीर झालेल्या पदांमध्ये अनेक शाळांत रिक्त पदे असूनही क्रीडा शिक्षकांचे एकही पद नसल्याने बीपीएड पात्र उमेदवारांमध्ये संपात व्यक्त केला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, आदिवासी विकास विभाग, शासकीय विद्यानिकेतने तसेच खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षण सेवक आणि शिक्षकांच्या भरतीसाठी पवित्र पोर्टलवर एकूण ३० हजार २०९ रिक्त पदे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

११ ऑगस्टपर्यंत पसंतीक्रम भरून तो लॉक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, या प्रक्रियेत क्रीडा शिक्षकांच्या मंजूर पदांचा समावेशच नाही. एकीकडे केंद्र सरकारकडून ‘खेलो इंडिया’ आणि ‘फिट इंडिया’सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना क्रीडेकडे वळविण्यावर भर दिला जात असताना, दुसरीकडे शाळांमध्ये क्रीडा शिक्षकांची पदे रिक्त ठेवली जात असल्याने क्रीडा शिक्षणाला दुय्यम स्थान दिले जात असल्याची टीका शिक्षक महासंघाने केली आहे.

अनेक उमेदवारांनी अभियोग्यता परीक्षा देऊन या भरतीची अनेक वर्षांपासून प्रतीक्षा केली आहे. त्यामुळे हातात पात्रता आणि अभियोग्यता परीक्षा असूनही शासनाने मंजूर केलेल्या पदांवर संधीच न मिळाल्याने पवित्र पोर्टलवरील भरतीत क्रीडा शिक्षकांचा संवर्ग का नाही, असा प्रश्न विचारण्यात आला आहे.

या पदांचा पवित्र पोर्टलच्या सध्याच्या भरतीत समावेश करणे शक्य असतानाही तो का करण्यात आला नाही, याचा खुलासा शिक्षण विभागाने करावा, अशी मागणी शिक्षक महासंघाचे मुंबई व कोकण विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केली. या मागणीला शिक्षक महासंघाचे मुंबई कार्याध्यक्ष सुभाष अंभोरे, उपाध्यक्ष विजय धनवडे, कोकण विभाग कार्याध्यक्ष संपत गीते यांनी पाठिंबा दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT