मुंबई : राज्यातील स्मशानभूमी विषयाचा अभ्यास करण्यासाठी ग्रामविकास विभागाने शुक्रवारी राज्यस्तरीय अभ्यास समिती गठीत केली आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली 31 जुलै 2025 रोजी ग्रामीण क्षेत्रातील स्मशान भूमीबद्दलची समस्या आणि उपाययोजना या संदर्भात राज्यस्तरीय अभ्यास समिती गठीत करणेबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राज्यातील ग्रामीण भागातील स्मशानभूमींच्या समस्यांवर उपाययोजना सुचविण्यासाठी अभ्यास समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
ग्रामविकास व पंचायत राज मंत्री या समितीचे अध्यक्ष असतील. तर आमदार अभिमन्यू पवार, देवेंद्र कोठे, अमित गोरखे हे सदस्य तर अपर आयुक्त (विकास), विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण हे सदस्य सचिव असतील. उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राम पंचायत), जि.प. गट विकास अधिकारी, पंचायत समिती 2 सदस्य याशिवाय मनीष मेश्राम, अशोक राणे, ऋषिकेश सकनूर, गुरप्रीत सिंह अहलुवालिया, अश्विनी चव्हाण, जयवंत तांबे हे अशासकीय सदस्य तर सामाजिक वनीकरण क्षेत्रातील आणि कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद यामधील प्रत्येकी एक सदस्य नियुक्त करण्यात आला आहे.
समितीची कार्यकक्षा
राज्यातील स्मशानभूमीबद्दलची सद्यस्थिती, स्मशानभूमी अद्ययावतीकरण आणि स्मशानभूमी परिसर सुशोभिकरण यावर अभ्यास करणे उपाययोजना सुचविणे.
हिंदू समाजातील दशनभूमी व दफनभूमी या विषयावर स्वंतत्र अध्ययन करणे.
ग्रामीण भागातील सामाजिक परिस्थिती सुधारण्यास सर्व हिंदू स्मशानभूमी सर्व जातीच्या नागरिकांना खुल्या करण्याबाबत आढावा घेणे.
जिवंतपणी मरण यातना भोगणाऱ्या दलित वंचित शोषितांच्या अपेष्टा मेल्यानंतर देखील संपत नाहीत. अत्यंत नाजूक आणि संवेदनशील विषयावर समिती सदस्य तितकेच संवेदनशील राहून अभ्यास करतील आणि राज्य शासनाला परिपूर्ण अहवाल सादर करतील, अशी अपेक्षा.गणपत भिसे, प्रतिज्ञा संस्था