

गोरेगाव : गेली अनेक वर्षे रखडलेल्या अंधेरी (पूर्व) येथील पीएमजीपीच्या 17 अतिधोकादायक इमारतींच्या पुनर्वसनाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर आणि म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्यात पार पडलेल्या बैठकीत येत्या डिसेंबरनंतर पुनर्वसनाच्या कामास सुरुवात करण्याचा तसेच रहिवाशांना तीन वर्षांचे भाडे एकत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांबाबत खासदार वायकर यांनी उपाध्यक्ष तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समवेत बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला मुंबई बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, सह मुख्याधिकारी वंदना सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता राठोड, कार्यकारी अभियंता विहार बोडके यांच्यासह इतर पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
पूनमनगर पीएमजीपी येथील रहिवाशांसाठी खरेदी विक्री कनेक्टिविटीचा कॅम्प सोमवारपासून लावण्यात येणार आहे. येथील सदनिका खरेदी केलेल्या व्यक्तीचे निधन झाले असेल, तर त्यांच्या वारसदारांकडून सक्सेशन प्रमाणपत्र प्राप्त होत नाही, तोपर्यंत मृत व्यक्तीच्या नावे खोली राखीव ठेवण्यात येईल. कुटुंबांनी मान्यता दिल्यावर भाड्याची वाटणी समान करण्यात येईल. या कामांसाठी एक समन्वय समिती गठीत करण्यात येणार आहे.
मेघवाडी सर्वोदय नगर प्रकल्प :
हे प्रकरण एनसीएलटीमध्ये प्रलंबित असल्याने हा प्रश्न सोडवण्यासाठी म्हाडा उपाध्यक्षांनी पुढील आठवड्यात बैठक घेण्याचे आश्वासन दिले असून त्याचा विकास म्हाडातर्फे करण्यासाठी निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.
समर्थ नगर ट्रांझिट कॅम्प प्रश्न :
येथील ट्रांझिट कॅम्प पाडून नवीन बांधण्यात येणार असून 2019 मध्ये शासनाने परिपत्रकही काढले आहे. यात अ, ब व क अशी विभागणी करण्यात येणार असून नव्याने ट्रांझिट कॅम्प बांधून झाल्यावर रहिवाशांना घरे देण्यात आहेत.
बिंबीसार नगर :
बिबिसार नगर वाणिज्य संकुल येथील व्यायाम शाळा स्थानिक रहिवाशी यांना वापरासाठी देण्यात यावी, अशी सूचना खासदार वायकर यांनी यावेळी म्हाडाच्या अधिकारी यांना केली ती मान्य करण्यात आली.
वर्सोव्यातील आराम नगर 1 व 2 या वसाहतीच्या पुनर्विकासाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली असून विकासकास ऑफर लेटर देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे.