ST Bus Stand Facilities
मुंबई : राज्यातील निवडक बसस्थानकांवर जेजुरी बसस्थानकाप्रमाणे अत्याधुनिक दुमजली प्रसाधनगृहे उभारण्यात येणार आहेत. या उपक्रमासाठी एसटी महामंडळाने १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
या प्रसाधनगृहांमध्ये महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतालयांची व्यवस्था असेल. तसेच रात्रीच्या वेळी बसस्थानकावर मुक्कामी येणाऱ्या प्रवाशांना सकाळी पुढील प्रवासासाठी निघण्यापूर्वी अंघोळ करता यावी, यासाठी स्वतंत्र स्नानगृहांची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या प्रसाधनगृहांची स्वच्छता आणि देखभाल व्यवस्थित राखली जावी, यासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवासाची सोयही त्याच ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रसाधनगृहांची नियमित स्वच्छता आणि देखभाल करणे अधिक सुलभ होईल, असा दावा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केला आहे.
सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर विकसित न होणाऱ्या बसस्थानकांवर एसटी महामंडळ स्वतःच्या खर्चातून ही कामे करणार आहे. एसटी प्रवास केवळ सुरक्षित आणि आरामदायीच नव्हे, तर स्वच्छ व आरोग्यदायीही असावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
या सुविधांमुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, रात्री प्रवास करणारे प्रवासी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून राज्यातील एसटी बसस्थानकांचा चेहरामोहराही बदलणार आहे, असा विश्वासही सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.