Central Railway DRM | मुंबई रेल्वेला अखेर मराठी अधिकारी मिळाला; प्रवासी संघटनांच्या पाठपुराव्याला मोठे यश

नवीन डीआरएम दीपक काटे यांच्या नियुक्तीने प्रवाशांमध्ये आनंदाची लाट
Central Railway
Central Railway Pudhari
Published on: 
Updated on: 

Divisional Railway Manager

डोंबिवली : कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटना, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ आणि इतर रेल्वे प्रवासी संघटनांच्या अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण लढ्याला अखेर मोठे यश आले आहे. रेल्वे मंत्रालयाने मुंबई विभागासाठी मराठी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची प्रवाशांची जुनी मागणी मान्य केली आहे. ही केवळ घोषणा नाही तर भारत सरकार, रेल्वे मंत्रालय, रेल्वे बोर्ड नवी दिल्ली यांनी शुक्रवारी २७ नोव्हेंबर रोजी काढलेला अधिकृत आदेशच आता समोर आला आहे. रेल्वे प्रशासनाच्या आदेशाने या नियुक्तीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

आदेश क्रमांक ई ओ ३, २०२६ टी आर ०४, ३ नुसार रेल्वे मंत्रालयाने राष्ट्रपतींच्या मान्यतेने असा निर्णय घेतला आहे. दीपक नारायण काटे यांची मध्य रेल्वेच्या एनएफएचएजी, आयआरएसई, डीआरएम सीएसटीएम (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ते हिरेश मीना (आयआरटीएस) यांच्या जागेवर कार्यभार स्वीकारतील. त्यांच्याबाबतचे पुढील आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येतील असेही या आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.

Central Railway
Mumbai Local Train Attack: लोकलमध्ये विडी ओढण्यास विरोध केल्याने प्रवाशावर धारदार शस्त्राने हल्ला

हा आदेश रेल्वे बोर्डाचे संचालक (आस्थापना) सी. के. विनोद यांनी स्वाक्षरी करून काढला असून त्याची प्रत मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांसह रेल्वे मंत्र्यांचे सचिव, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सीईओ, सर्व सदस्य, सर्व महासंचालक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आली आहे. या अधिकृत आदेशाची प्रत समोर येताच कल्याण, कसारा, कर्जत, ठाणे, डोंबिवलीसह संपूर्ण मुंबई उपनगरीय मार्गावरील प्रवाशांमध्ये आनंदाची आणि समाधानाची लाट पसरली असून अनेक प्रवाशांनी ही आमच्या संघर्षाची खरी पावती आहे, अशी भावना व्यक्त केली आहे.

रेल्वे मंत्री आणि रेल्वे बोर्डाचे चेअरमन यांच्याकडे सातत्याने लेखी तक्रार, विनंती आणि पाठपुरावा करून प्रवासी संघटनांनी हा मुद्दा लावून धरला होता. अखेर त्याला अधिकृत यश मिळाले आहे. यापूर्वी मुंबई विभागात येणाऱ्या इतर भाषिक डीआरएम यांना मुंबई विभाग समजून घेण्यासाठी तब्बल एक वर्ष लागत असल्याचे संबंधित अधिकारी वैयक्तिकरित्या सांगत असत. त्यामुळे स्थानिक भाषा, स्थानिक प्रश्न, गर्दीच्या वेळा, लोकलचे वेळापत्रक, पावसाळ्यात रेल्वे मार्गांवर पाणी साचणे, प्लॅटफॉर्मवरील गर्दी, तिकीट खिडक्यांची कमतरता, महिला डब्यांची सुरक्षा, वृद्ध आणि दिव्यांग प्रवाशांच्या अडचणी यांसारख्या रोजच्या जिव्हाळ्याच्या समस्या समजून घेण्यासाठी मराठी अधिकारी असणे ही प्रवाशांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती.

Central Railway
Mumbai Byculla Knife Attack: जेवणाच्या पैशांवरून चुलत भावावर हल्ला; भायखळ्यातील धक्कादायक घटना

आता दीपक काटे यांच्यासारखा मराठी अधिकारी आल्यामुळे मुंबई रेल्वेचा विकास खऱ्या अर्थाने झपाट्याने होईल, प्रवाशांच्या समस्या थेट भाषेत मांडता येतील आणि निर्णयही जलद होतील अशी ठाम खात्री प्रवासी संघटनांनी व्यक्त केली आहे. दीपक काटे यांच्या नियुक्ती संदर्भात बोलताना कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटना आणि उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे राजेश घनघाव यांनी रेल्वे मंत्रालयाचे मनापासून आभार मानले. प्रवाशांची अनेक वर्षांची मागणी मान्य करून मुंबईला मराठी अधिकारी दिल्याबद्दल रेल्वे मंत्री आणि रेल्वे बोर्डाचे चेअरमन यांचे विशेष आभार व्यक्त केले. आम्ही फक्त तक्रार केली नाही तर सातत्याने पाठपुरावा केला. पत्रव्यवहार केला. प्रवाशांच्या भावना रेल्वे मंत्रालयापर्यंत पोहोचवल्या आणि त्याचेच हे फळ असल्याचे राजेश घनघाव यांनी सांगितले.

 रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांची ही रास्त मागणी मान्य केल्याबद्दल सर्व संघटनांनी रेल्वे मंत्रालयाचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले असून दीपक काटे यांचे सर्व प्रवासी संघटनांच्या वतीने अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा दिल्या. या ऐतिहासिक निर्णयाचे श्रेय कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटना आणि उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे राजेश घनघाव यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि लाखो प्रवाशांच्या एकजुटीला जात असून आता नवीन डीआरएम दीपक काटे यांच्याकडून प्रवाशांना मोठ्या अपेक्षा असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.