

विटा : विजय लाळे
कोयना जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मिती नंतरचे म्हणजे अवजल (टेलरेस) समुद्रात वाहून जाणारे पाणी मुंबईकडे वळविण्याच्या राज्य शासनाच्या प्रस्तावावरून सध्या चर्चा रंगली आहे. वीजनिर्मितीनंतरचे हे पाणी पुढे समुद्रात वाया जाते हा शासनाचा मुख्य युक्तिवाद असला, तरी प्रत्यक्षात असे करणे म्हणजे अखंड भौगोलिक महाराष्ट्राच्या एकात्मतेला सुरुंग लावण्याचाच प्रकार म्हणून याकडे पाहिले पाहिजे. महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचे अनेक जे प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत त्यातलाच हा एक प्रकार आहे. आधीच पश्चिम महाराष्ट्र विरुद्ध विदर्भ मराठवाडा अशा प्रादेशिक भेदाची भिंत उभी असतानाच आता कोकण पश्चिम महाराष्ट्र विरुद्ध मुंबई असा नवा प्रयोग कोयनेच्या पाण्याच्या निमित्ताने राज्य सरकार करू पाहत आहे, असा आरोप 'बारमाही माणगंगा' अभ्यास पथकाने केला आहे.
कोयना धरणाचा इतिहास पाहिला तर या धरणाचे बांधकाम १९५६ मध्ये सुरू झाले आणि १९६३–१९६४ दरम्यान पूर्ण झाले. मात्र धरण पूर्ण होण्यापूर्वीच पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करून १६ मे १९६२ रोजी येथून वीज निर्मितीला प्रारंभ झाला. कोयना प्रकल्पाची मूळ रचना सिंचन, वीज निर्मिती आणि नदीपात्रातील विसर्ग यांचा समतोल साधणारी आहे. पुढे वीजनिर्मितीचे प्रमाण वाढल्यानंतर सिंचनाच्या पाण्यावरून तक्रारी आल्या आणि १९७९ मध्ये सिंचन की वीजनिर्मिती यावर चर्चा होऊन टक्केवारीचे निकष निश्चित झाले. आज त्या निकषांनुसार वीजनिर्मिती सुरू आहे. पश्चिमेकडे वळवलेल्या सुमारे ६७.५ टीएमसी पाण्यावर वीजनिर्मिती झाल्यानंतर ते वाशिष्ठी नदीमार्गे दाभोळ खाडीतून अरबी समुद्राला मिळते. सन १९७८-७९ च्या दरम्यान हे पाणी पुन्हा उपसून धरणात सोडण्याचा प्रस्ताव एका अभियंत्यांनी मांडला होता. मात्र, त्या काळात पाणी उचलण्यासाठी लागणाऱ्या विजेचा खर्च सुमारे एक रुपया आणि त्यातून मिळणाऱ्या वीज निर्मितीचे मूल्य सुमारे ८० पैसे असे होते, त्यामुळे ही योजना आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य ठरली होती.
आज परिस्थिती झपाट्याने बदलली आहे. सौरऊर्जेचे दर मोठ्या प्रमाणात खाली आले आहेत. राज्यात भीमाशंकर, तारळी यांसारख्या ठिकाणी खासगी कंपन्यांकडून सौरऊर्जेवर आधारित ‘पंप स्टोरेज’ प्रकल्पांची आखणी सुरू आहे. दिवसा उपलब्ध होणाऱ्या स्वस्त सौरऊर्जेवर खालचे पाणी वरच्या धरणात चढवायचे आणि गरजेनुसार वीजनिर्मिती करायची, हे या प्रकल्पांचे सूत्र आहे. हे तंत्रज्ञान जर इतर ठिकाणी व्यवहार्य ठरत असेल, तर त्याच धर्तीवर कोयनेच्या पाण्याचा विचार का होऊ नये, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मुंबई, पुणे यांसारख्या शहरांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्याचा पर्यायही तपासता येईल. पावसाळ्यात अतिवृष्टी आणि समुद्राची भरती एकाच वेळी आल्यास वाशिष्ठी नदीकाठच्या चिपळूण आणि परिसरात पूरस्थिती गंभीर बनते. पण कोयनेचे पाणी वीज निर्मितीनंतर मुंबईकडे वळवणे सुरू झाले तर वाशिष्ठी नदीतील प्रवाह पूर्णपणे थांबवल्यास दाभोळ खाडीतील खारे पाणी चिपळूणपर्यंत आत शिरून शेती व विहिरी खारट होण्याचा धोका असतो. तसेच लोटे-परशुराम येथील एमआयडीसी, स्थानिक पाणी पुरवठा आणि शेती यांसाठी नदीत किमान प्रवाह टिकवणे आवश्यक असते. पावसाळ्यात केवळ कोयनेचे पाणीच नव्हे, तर स्थानिक मुसळधार पाऊस आणि समुद्राची भरती यामुळेही पूर येतो. त्यामुळे चिपळूण शहर आणि परिसरातील पूरनियंत्रणास याचा कितपत हातभार लागेल हा प्रश्नच आहे. याशिवाय कृष्णा पाणी वाटप लवादाचे नियम, मुंबईकडे पाणी उचलण्यासाठी लागणारी प्रचंड उंची (पंपांचे हेड यार्थी) आणि पंपिंग क्षमता, तसेच आजचा भांडवली खर्च परवडणारा नाही. तसेच तारळी किंवा भीमाशंकर प्रमाणे इथल्या पंपिंग हाऊससाठी सौर ऊर्जा वापरायची ठरली तर, पुन्हा किती वृक्षतोड करावी लागेल याची कल्पनाच न केलेली बरी, असे बारमाही माणगंगा' अभ्यास पथकाचे म्हणणे आहे.
दुसरीकडे, ज्यावर्षी कोयना पाण लोट क्षेत्रात पाऊस कमी पडतो आणि धरण पूर्ण भरत नाही, त्या वर्षी 'वीजनिर्मिती किंवा पिण्याचे पाणी की सिंचन' असा मोठा संघर्ष उभा राहतो. मुंबईसारख्या महानगराची पिण्याची गरज एकदा कोयनेशी जोडली गेली, तर कायद्यानुसार 'पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य' द्यावे लागते, अशा वेळी टंचाईच्या काळात टेंभू, ताकारी, म्हैसाळ, जिहे कटापूर या उपसा जलसिंचनाच्या आरक्षित किंवा राखीव कोट्यावर गदा येण्याची शक्यता आहे, शिवाय हे पाणी थेट मुंबईला वळवले, तर खानापूर-आटपाडी, जत, कवठे महांकाळ तासगाव, सांगोला, माण-खटाव यांसारख्या कायमस्वरूपी दुष्काळी पट्ट्याला भविष्यात वाढीव पाणी मिळण्याची संधी कायमची बंद होऊ शकते. सध्या कृष्णा पाणी वाटप लवादानुसार पश्चिमेकडे ६७.५ टीएमसी पेक्षा एक थेंबही जास्त पाणी वळवता येत नाही. मात्र भविष्यात मुंबईची लोकसंख्या वाढल्यानंतर या ६७.५ टीएमसीपेक्षा अधिक पाण्याची मागणी झाल्यास, थेट कृष्णा खोऱ्यातील सिंचनाच्या पाण्यावरच दबाव येऊ शकतो. कारण, पुन्हा कायदाच सांगतो, पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य' हे कारण पुढे केले जाईल. मात्र असे झाले तर आपल्या हक्काचे पाणी मुंबईकडे वळवले म्हणून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र विरुद्ध मुंबई असा नवा प्रादेशिक संघर्ष सुरू होईल. या सगळ्याचा साकल्याने विचार करता सध्याच्या प्रकल्पांवर होणारा विरोध आणि पाण्याचा अपव्यय टाळायचा असेल, तर शासनाने मुंबईकडे पाणी वळवण्याचा विचार सोडून देणेच योग्य ठरेल, अशी सूचनाही बारमाही माणगंगा अभ्यास पथकाने केली आहे.
कोयना जलविद्युत प्रकल्पात पाहिल्यांदा कोयना (जि. सातारा) धरणातून म्हणजे शिवसागर जलाशयातून पाणी भूमिगत बोगद्यांद्वारे सह्याद्रीच्या डोंगरातून पश्चिमेकडे रत्नागिरी जिल्ह्यातील पोफळी (ता. चिपळूण) येथील वीजगृहांमध्ये नेले जाते. तिथे टप्पा १, २ आणि ४ मधून वीज निर्मिती झाल्यावर हे पाणी कोळ केवाडी धरणात साठवले जाते आणि तेथून तिसऱ्या टप्प्याची वीज निर्मिती करून अवजल (टेलरेस) वाशिष्ठी नदीत सोडले जाते. वाशिष्ठी नदीतून हे पाणी पुढे चिपळूणमार्गे वाहत जाऊन दाभोळ खाडीतून अरबी समुद्राकडे जाते.