Maharashtra SSC Exam 2026 Pudhari
मुंबई

Maharashtra SSC Exam 2026: 16 लाखांहून अधिक विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

उद्यापासून राज्यभरात परीक्षा सुरू, मुंबई विभागातून 3 लाख 49 हजार परीक्षार्थी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारीमार्च 2026 मधील दहावीच्या परीक्षेसाठी यंदा राज्यभरातून एकूण 16 लाख 15 हजार 489 विद्यार्थी बसणार आहेत. मंडळाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार या परीक्षेसाठी मुलांची संख्या 8 लाख 65 हजार 740, तर मुलींची संख्या 7 लाख 49 हजार 736 इतकी आहे. याशिवाय 13 ट्रान्सजेंडर विद्यार्थी देखील परीक्षेला बसणार असल्याची नोंद मंडळाने केली आहे.गेल्या वर्षीच्या तुलनेत विद्यार्थ्यांची संख्या 3 हजार 879 ने वाढली आहे. यात मुलांची संख्या 1,630 ने वाढली असून मुलींची संख्या 2 हजाराने 255 ने वाढली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात येणारी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षा शुक्रवार, 20 फेब्रुवारी ते बुधवार, 18 मार्च या कालावधीत राज्यभर आयोजित करण्यात आली आहे. यंदा दहावीच्या परीक्षेसाठी राज्यातील 23 हजार 683 शाळांमधून 16 लाख 15 हजार 489 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये 8 लाख 65 हजार 740 मुले, 7 लाख 49 हजार 736 मुली आणि 13 ट्रान्सजेंडर विद्यार्थी आहेत. राज्यात ही परीक्षा 5 हजार 111 मुख्य केंद्रांवर होणार आहे.

विभागनिहाय पाहता मुंबई विभागात सर्वाधिक 3 लाख 49 हजार 873 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. राज्यातील सर्व विभागांमध्ये ही संख्या सर्वाधिक आहे. 1 लाख 82 हजार 808 मुले आणि 1 लाख 67 हजार 661 मुली परीक्षेला बसणार आहेत. तसेच 4 ट्रान्सजेंडर विद्यार्थी देखील परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. मुंबई विभागात 1 हजार 4 केंद्रे असतील. तसेच तेवढेच केंद्र संचालक या केंद्रांची जबाबदारी सांभाळणार आहेत. या केंद्रांमध्ये प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका पोहोचवण्यासाठी 71 कस्टडी असतील.

गेल्या वर्षीच्या अनुभवानुसार मुंबई विभागात दहावीसाठी एक केंद्र संवेदनशील जाहीर करण्यात आले आहे. तसेच मुंबई विभागात परीक्षा विनासायास पार पाडण्यासाठी 21 भरारी पथके आणि 8 बैठी पथके तैनात करण्यात आली आहेत, अशी माहिती मुंबई विभागीय अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांनी सांगितले.

कोकण विभागात सर्वात कमी 25 हजार 779 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. पुणे विभागात 2 लाख 78 हजार 145, नागपूरमध्ये 1 लाख 53 हजार 890, छत्रपती संभाजीनगरमध्ये 1 लाख 91 हजार 952, कोल्हापूरमध्ये 1 लाख 32 हजार 808, अमरावतीत 1 लाख 65 हजार 318, नाशिकमध्ये 2 लाख 6 हजार 636 आणि लातूरमध्ये 1 लाख 11 हजार 88 विद्यार्थी आहेत. परीक्षा सुरळीत व पारदर्शक पार पाडण्यासाठी मंडळाने कॉपीमुक्त अभियान राबविले आहे. बहुतांश केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवण्यात येणार असून संशयित गैरप्रकारांवर तातडीने कारवाई केली जाणार आहे. जिल्हानिहाय दक्षता पथके नियुक्त करण्यात आली आहेत. परीक्षा केंद्रांभोवती 400 मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्याचे तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पहिला पेपर प्रथम भाषेचा.. वेळापत्रकात विषयांमध्ये खंड

दहावीचा पहिला पेपर मराठी प्रथम भाषेचा होणार आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक ताणात घट व्हावी, यासाठी परीक्षा वेळापत्रक तयार करताना महत्त्वाच्या विषयांच्या पेपरांमध्ये पुरेसा खंड ठेवण्यात आला आहे. मंडळामार्फत अधिकृतरीत्या जाहीर केलेले व छापील वेळापत्रकच ग्राह्य धरण्याचे आवाहन करण्यात आले असून, इतर संकेतस्थळांवरील किंवा अनधिकृत वेळापत्रकांवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

परीक्षा केंद्रे व परिरक्षक

विद्यार्थी नोंदणी केलेल्या शाळा : 4501

एकूण मुख्य परीक्षा केंद्रे : 1004

एकूण परिरक्षक : 71

केंद्रसंचालक : 1054

उपकेंद्रसंचालक : 800

रनर : 1004

पर्यवेक्षक : 13,937

नियामक : 2850

परीक्षक : 12,300

भरारी पथके : 21

बैठी पथके : 8

मुख्य नियामक : 17

संवेदनशील केंद्रे : 1

मानसिक आधारासाठी हेल्पलाईन

तणावातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे यासाठी राज्य मंडळाने समुपदेशकांची नियुक्ती केली असून हेल्पलाईन सुविधा सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थी 9960644411, 7972573742, 9834084593, 9359978315, 8169202214, 9371661255, 7208429381, 7709156068, 9404783996 या संपर्क क्रमांकावर समुपदेशनासाठी संपर्क साधू शकणार आहेत.

मुंबई विभागीय मंडळाची जिल्हानिहाय आकडेवारी

ठाणे : 1,19,107

पालघर : 64,173

रायगड : 37,653

मुंबई दक्षिण : 27,965

मुंबई पश्चिम : 54,493

मुंबई उत्तर : 45,290

एकूण दहावीचे विद्यार्थी : 3,49,873

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT