मुंबई : राज्यातील विविध मैदानांवर खेळणाऱ्या मुलींसाठी शौचालय व चेंजिंग रूमच्या अभावामुळे गैरसोय होत आहे. या प्रकरणी लोकायुक्तांकडे सुनावणी झाल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानपरिषदेत दिली.
राज्यातील क्रीडा मैदानांवर महिला खेळाडूंसाठी स्वच्छतागृहे बांधण्याबाबत शिवसेना (ठाकरे) आमदार मिलिंद नार्वेकर यांनी तारांकित प्रश्न मांडला होता. आमदार निधी देऊन ही स्वच्छतागृहे उभारली जात नाहीत, अशी खंत व्यक्त करत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी नार्वेकर यांनी केली. या प्रश्नाच्या चर्चेत चित्रा वाघ, ॲड.अनिल परब, प्रविण दरेकर यांनी सहभाग घेत खेळाडूंसाठी स्वच्छतागृहे नसल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ बोलत होत्या.
मैदानांवर महिला खेळाडूंसाठी स्वच्छतागृहे बांधण्याबाबत लोकायुक्तांच्या निर्देशानुसार ८ जानेवारी २०२५ रोजी विशेष चौकशी पथकाची अधिकृत स्थापना करण्यात आली असून राज्यातील सर्व मैदाने व क्रीडा संकुलांचे गुगल मॅपिंग करण्याचे काम सुरू आहे. संबंधित मैदानांवरील विद्यमान सुविधा, आवश्यक सोयीसुविधा, तसेच त्यासाठी लागणाऱ्या निधीचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नियमानुसार २ हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या मैदानांवर स्वच्छतागृह असणे बंधनकारक आहे.
मात्र, ओव्हल मैदान संदर्भात प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे काही ठिकाणच्या मैदानांवर कायमस्वरूपी बांधकाम करता येत नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच एका मैदानासंदर्भातील निर्णय संपूर्ण महाराष्ट्रातील किंवा मुंबईतील सर्व मैदानांना लागू होतो का, याबाबत एसआयटीला विधी विभागाकडून स्पष्ट मत घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मैदानावर शौचालय व चेजिंग रुमसाठी कंटेनरचा पर्याय आहे. त्यामुळे पुढील काळात मैदानावर कायमस्वरूपी बांधकाम शक्य नसल्यास कंटेनरच्या माध्यमातून तात्पुरती शौचालय व चेंजिंग रूम उभारण्याचा पर्यायही विचारात घेतला जाईल, असे मिसाळ यांनी स्पष्ट केले.