

मुंबई : सीईटी सेल अंतर्गत होत असलेल्या एमबीए व एमसीए या व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी घेण्यात येत असलेल्या सीईटीसाठी गतवर्षीपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.तब्बल 1 लाख 80 हजार 792 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यावर्षी परीक्षेसाठी दोन संधी देण्याच्या निर्णयामुळे अर्जदारांची संख्या य वाढली आहे.
राज्यातील एमबीए/एमएमएस प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या सीईटी परीक्षेला यंदा विक्रमी प्रतिसाद मिळाला आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठीच्या नोंदणी प्रक्रियेची सांगता 25 फेब्रुवारी रोजी झाली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने अंतिम आकडेवारी जाहीर केली आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून प्रवेश परीक्षेसाठी दोन संधी देण्याचा निर्णय घेतला होता.
त्याचा थेट परिणाम नोंदणीवर दिसून आला आहे. पहिल्या संधीसाठी 1 लाख 32 हजार 798 विद्यार्थ्यांनी अंतिम नोंदणी केली, तर दुसऱ्या संधीसाठी 47 हजार 994 विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चित केला. त्यामुळे एकूण नोंदणीचा आकडा 1 लाख 80 हजारांच्या पुढे गेला आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत ही सर्वाधिक संख्या ठरली आहे. या अभ्यासक्रमाची पहिली सीईटी परीक्षा 6 एप्रिल ते 8 एप्रिल 2026 या कालावधीत घेण्यात येणार आहे, तर दुसरी संधी 9 मे 2026 रोजी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अर्ज भरताना झालेल्या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्यात आली आहे. 28 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत ऑनलाईन दुरुस्ती सुविधा खुली राहणार आहे. ज्यांनी परीक्षा शुल्क भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे, अशा विद्यार्थ्यांना आपल्या लॉगिनमधून नाव, जन्मतारीख, छायाचित्र, सही, लिंग तसेच ‘दोन्ही संधी’ पर्यायात बदल करता येणार आहेत.
एमबीए / एमएमएस
सीईटीला आलेले विद्यार्थी
2023-24 : 1,30,927
2024-25 : 1,52,911
2025-26 : 1,57,281
2026-27 : 1,80,792
(दोन्ही संधी मिळून)