मुंबई : निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) केले असून यात २१ लाख २४ हजार १३२ मतदारांमध्ये विसंगती आढळून आली. व काही मतदारांचे अनमॅपिंग झाले आहे. त्यामुळे या सर्वांना पुन्हा एकदा आपले नाव मतदार यादीत नोंदवण्याची संधी येणार आहे. यासाठी निवडणूक विभागाकडून सुनावणी घेण्यात येणार असून मतदारांना नोटीस बजावण्यात येणार आहे.
मुंबईसह संपूर्ण देशामध्ये मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण झाले. यात काही मतदारांच्या नावांमध्ये विसंगती दिसून आली. यात सध्याच्या मतदार यादीत आणि मागील विशेष नोंदणीच्या वेळी तयार केलेल्या मतदार यादीत वडिलांच्या नावांमध्ये तफावत, गणना अर्जात दाखवलेल्यानुसार, मतदाराची नोंद मागील विशेष नोंदणीच्या वेळी तयार केलेल्या मतदार यादीशी चुकीच्या पद्धतीने झाली आहे.
२००२ च्या मतदार यादीत नाव असलेल्या मतदाराचे सुधारित मतदार यादीत नाव नाही. अनेकांचा फोटो एकसारखा होता. त्याशिवाय अनेकांचे मॅपिंगच झाले नाही. अशा मतदारांना पुन्हा एक संधी देऊन, त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहे. यासाठी बीएलओमार्फत त्यांना नोटीस बजावण्यात येणार आहे.
नोटीस मिळाली नाही म्हणून तक्रार येऊ नये यासाठी स्वतः बीएलओ त्यांच्या घरी जाऊन नोटीस सोबत सेल्फीही घेणार आहेत. याबाबतचे ट्रेनिंग अलीकडेच पार पडले. मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये विसंगती असलेल्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ विधानसभा मतदार संघामध्ये ५ लाख ९० हजार ७४६ तर मुंबई शहर विभागातील १० विधानसभा मतदार संघामध्ये १ लाख ४१ हजार २९१ मतदार आढळले. अनमॅपिंग झालेल्या मतदारांमध्ये उपनगरातील २६ विधानसभेमध्ये १० लाख ७५ हजार १८८ तर शहरातील १० विधानसभा मतदारसंघांमध्ये ३ लाख १६ हजार ९०७ मतदार आढळून आले.
नोंदणी अधिकारी घेणार सुनावणी
विसंगती व अन मॅपिंग झालेल्या मतदारांची संख्या मोठी असल्यामुळे ९६८ नोंदणी अधिकारी घेणार सुनावणी घेणार आहेत. यात मुंबई उपनगर ७१० व मुंबई शहर २५८ सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
३० सप्टेंबरपर्यंत हरकती दाखल करता येणार
प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. प्रारूप मतदार यादीत नाव नसल्यास किंवा नोंदीबाबत आक्षेप असल्यास दिनांक ३० सप्टेंबरपर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी मतदारांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी व महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी केले आहे.
नोटीस.. सेल्फीही
नोटीस मिळाली नाही म्हणून तक्रार येऊ नये यासाठी स्वतः बीएलओ त्यांच्या घरी जाऊन नोटीस सोबत सेल्फीही घेणार आहेत. याबाबतचे बीएलओचे ट्रेनिंग अलीकडेच मुंबईत पार पडले.
मुंबई शहर
१० विधानसभा
विसंगती : १,४१,२९१
अनमॅपिंग : ५,९०,७४६
मुंबई उपनगर
२६ विधानसभा
विसंगती : ३,१६,९०७
अनमॅपिंग : १०,७५,१८८