मुंबई: विदर्भ वगळता राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांचे दरवाजे सोमवारपासून पुन्हा उघडणार असून, चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळा पुन्हा गजबजून जाणार आहेत. नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात संस्मरणीय करण्यासाठी राज्यभर ‘शाळा प्रवेशोत्सव’ साजरा केला जाणार असून, विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांमध्ये विशेष तयारी करण्यात आली आहे. विदर्भ विभागात मात्र पावसाळ्याच्या वेळापत्रकानुसार ३० जून रोजी प्रवेशोत्सव साजरा केला जाणार आहे.
शालेय शिक्षण विभागाने शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्याचे निर्देश दिले आहेत. विद्यार्थ्यांना फुले, पुष्पगुच्छ, चॉकलेट, शालेय साहित्य देऊन त्यांचे स्वागत केले जाणार आहे.
तसेच शाळांचे परिसर सजविणे, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे आणि शाळेतील वातावरण आनंददायी ठेवण्यावर भर देण्यात आला आहे. नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शाळांमध्ये सकारात्मक आणि चैतन्यमय वातावरण निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबईत राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते भायखळा पूर्व येथील न्यू भायखळा मुंबई पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व चॉकलेटचे वाटप, पाटीपूजन, दीपप्रज्वलन तसेच राष्ट्रगीत, वंदे मातरम् आणि राज्यगीताच्या सादरीकरणासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राज्यपाल शाळेतील ॲस्ट्रॉनॉमी लॅब, स्मार्ट वर्गखोल्या, बालवाडी विभाग आणि संगणक प्रयोगशाळेची पाहणी करणार आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील दुर्गम तोरणमाळ येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय विद्यालयात शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय प्रवेशोत्सव होणार आहे. आदिवासीबहुल भागातील या निवासी विद्यालयात विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना शालेय साहित्याचे वाटप केले जाणार आहे. यावेळी पहिल्यांदाच शाळेची पायरी चढणाऱ्या चिमुकल्यांसाठी विशेष स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
शाळेचा पहिला दिवस हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. विशेषत: इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा दिवस अधिक उत्सुकतेचा असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करून शाळेविषयी आपुलकी निर्माण करण्यासाठी प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि शिक्षणप्रेमी विविध शाळांना भेट देणार आहेत.