मुंबई ः महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवावयाच्या 7 जागांसाठी फक्त सातच उमेदवारी अर्ज सादर झाले असल्याने आता ही निवडणूक बिनविरोध होणार, हेे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला. भाजपने आपले चार उमेदवार बुधवारीच जाहीर केले होते, तर राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांचे नाव निश्चित होते; परंतु गुरुवारच्या नाटकीय घडामोडीत शिवसेना शिंदे गटाकडून पक्षाच्या प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांना संधी देण्यात आली. त्याचबरोबर शिवसेनेने दुसरा उमेदवार दिला नसल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.
महायुतीकडून केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भारतीय जनता पक्षाकडून राष्ट्रीयस्तरावर सरचिटणीसपदाची जबाबदारी पार पाडणारे विनोद तावडे, मायाताई ईवनाते आणि रामराव वडकुते या चौघांचे अर्ज दाखल करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पार्थ पवार यांचा एकमेव अर्ज, तर शिवसेना शिंदे गटाकडून डॉ. ज्योती वाघमारे यांचा एकच अर्ज दाखल करण्यात आला आहे. तांत्रिक छाननीत हे सर्व अर्ज मंजूर झाल्यानंतर महाराष्ट्रातील निवडणुकीची प्रक्रिया बिनविरोध झाल्याचे जाहीर केले जाईल.
शिवसेना शिंदे गटात शिवसेना ‘उबाठा’ सोडून आलेले माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ यांचाही राज्यसभेसाठी आग्रह होता. या तीन नावांमध्ये होणारी साठमारी लक्षात घेता शिवसेना शिंदे गटाने डॉ. ज्योती वाघमारे या दलित समाजातील एका कार्यकर्त्या महिलेला राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला.
डॉ. ज्योती वाघमारे या सोलापूर विद्यापीठाशी संबंधित असून, त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी निभावली आहे. त्या अत्यंत उत्तम बोलतात. तसेच, त्या उच्चविद्याविभूषित आहेत. श्रीलंकेमधील वर्ण संघर्षावर त्यांनी सोलापूर विद्यापीठात पीएच.डी. केली आहे. शिवसेना शिंदे गटाची बाजू दिल्ली दरबारात इंग्रजी भाषेत त्या मांडू शकतील. कारण, इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे, असाही मुद्दा पुढे करण्यात आला.
शिवसेना ठाकरे गटाकडून प्रियंका चतुर्वेदी यांचे नाव अंतिम होईल, अशी माहिती एकनाथ शिंदे गटाला मिळाली होती. त्यामुळे महिलेला प्राधान्य द्यायचा निर्णय झाला होता. गुरुवारी शायना एन. सी. यांनीदेखील शिंदे यांच्याशी संपर्क साधून या उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी केली, विनंती केली, असे बोलले जाते. मात्र, वाघमारे यांची निवड झाली आहे. दलित समाजातील महिलेला संधी दिल्यामुळे सोशल इंजिनीअरिंग पूर्ण झाल्याचे बोलले जाते.
पार्थ पवारांसाठी मुख्यमंत्री हजर!
पार्थ पवार यांनी गुरुवारी अर्ज दाखल केला, त्यावेळेला त्यांची आई, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आवर्जून उपस्थित होते.
शरद पवारांचा अर्ज घरातून;अधिकारी ‘सिल्व्हर ओक’वर
दरम्यान, महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच शरद पवार यांनी घरातूनच अर्ज सादर केला. राज्यसभेचा अर्ज सादर करताना प्रतिज्ञापत्र देत ते खरे असल्याची शपथ घ्यावी लागते. वैद्यकीय सल्ल्यामुळे शरद पवार यांना सार्वजनिक मंचावर हजर राहणे शक्य नसल्यामुळे निवडणूक अधिकारी पवार यांच्या घरी ‘सिल्व्हर ओक’ येथे गेले होते. आजवर कुणीही असा अर्ज घरून भरलेला नाही.
शिवसेना शिंदे गटाकडे होते लक्ष
गुरुवारी दुपारपर्यंत शिवसेना शिंदे गटातर्फे एक अन्य उमेदवार रिंगणात दाखल केला जाईल, अशी चर्चा होती. सचिन तेंडुलकर यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधान भवनात परतले, तेव्हा दुसराही तयार आहे, असे उद्गार त्यांनी काढले. याचा अर्थ शिवसेना शिंदे गट दोन उमेदवार रिंगणात उतरवणार, असा काढणे सुरू झाले. मात्र, शरद पवार रिंगणात उतरले असल्याने निवडणूक नको. एखादेही मत इकडेतिकडे झाले तर अनवस्था प्रसंग ओढावेल, असे लक्षात घेत निवडणूक टाळण्यात आली.
बड्या नेत्याच्या भांडणात ज्योती वाघमारे यांना लॉटरी
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी अखेरच्या तासापर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या उमेदवाराच्या नावाबाबत सस्पेन्स ठेवला, असे असले तरी राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी शिंदे गटाच्या माजी खासदारांमधील भांडणे हे उमेदवार जाहीर होण्याच्या विलंबाचे कारण असल्याचे कळते.
राज्यसभेच्या 7 जागांपैकी एक जागा शिंदे यांच्या वाट्याला आली आहे; पण या एकमेव जागेसाठी शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ, गजानन कीर्तिकर, राहुल शेवाळे, हेमंत गोडसे अशा 5 माजी खासदारांसह आमदार मनीषा कायंदे, शायना एन. सी. असे अनेकजण इच्छुक होते. सगळ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या जागेवर नेमण्याचे साकडे घातले होते. नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे यांनी, आपला या जागेवर दावा असल्याचे सांगितले. अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे ते नाराज आहेत. ज्योती वाघमारे यांना उमेदवारी दिल्यानंतर अडसूळ यांनी उघड नाराजी व्यक्त केली. वरिष्ठांच्या मनात जे होते, ते झाले. आता त्यावर अधिक बोलणे योग्य वाटत नाही, असे अडसूळ म्हणाले. राज्यपालपद देण्याचे आश्वासन दिले होते; पण ते दिले गेले नाही, असेही त्यांनी सांगितले. मीसुद्धा राज्यसभेची उमेदवारी मागितली होती, असे गजानन कीर्तिकर म्हणाले. विधानसभा निवडणुकीत भाजपमधून शिंदे गटात प्रवेश केलेल्या शायना एन. सी. यांची येथे ही निराशा झाली. भाजपमध्येही त्यांचे नाव नेहमी इच्छुकांमध्ये येत असे. मनीषा कायंदे यांची विधान परिषदेतील आमदारकीची मुदत संपत आहे. त्यामुळे त्याही राज्यसभेच्या स्पर्धेत होत्या.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी सांभाळणारे राहुल शेवाळे यांना राज्यसभेवर पाठवावे हे जवळपास निश्चित झाले होते. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ज्येष्ठ नेत्याने ‘शेवाळे यांनी केलेच काय? त्यांच्यामुळे मुंबई महापालिकेत पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही,’ असा आक्षेप उपस्थित करत त्यांच्या उमेदवारीला विरोध केला. शेवाळे यांना संधी द्यायची असेल तर त्यापेक्षा मला राज्यसभेत पाठवा, अशी लोकाधिकाराचे काम सांभाळणाऱ्या या नेत्याची भूमिका होती.