Maharashtra Rain Update Today :
दिवाळीचा सण जवळ आला असतानाच, हवामान विभागाने पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. १६ आणि १७ ऑक्टोबर रोजी राज्यातील तब्बल १५ जिल्ह्यांना 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. यामुळे आधीच ओल्या दुष्काळामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, लातूर, धाराशीव, नाशिक आणि घाट परिसर, जळगाव, अहिल्यानगर , पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी, धुळे, पालघर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नाशिक, पालघर आणि पुणे घाट या परिसरात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत पावसाला सुरुवातही झाली आहे.
यंदा मे महिन्यापासूनच महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. यामुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतमाल शेतातच सडून गेला आहे. आता दिवाळीच्या तोंडावर पुन्हा पावसाचा अंदाज असल्याने राहिलेला शेतमाल वाचेल की नाही, या भीतीने शेतकरी चिंतातुर झाले आहेत.
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार नागरिकांनी सतर्क राहावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. विशेषतः विजांचा कडकडाट असताना नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे.