मुंबई: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम राज्यातील हवामानावर होणार असून, राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागांत पावसाची तीव्रता कायम राहणार असून, रविवारी उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकणात १२ ते १६ सप्टेंबरदरम्यान मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रात १२ आणि १३ सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यात १२ सप्टेंबर रोजी काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता असून, विदर्भात १२ सप्टेंबर रोजी मुसळधार, तर १३ आणि १४ सप्टेंबर रोजी मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाचे पुनरागमन झाल्याने राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे स्थानिक पातळीवर पाणी साचण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.