मुंबई : राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांत प्राध्यापकांची मेगाभरती होणार आहे. वित्त विभागाने प्राध्यापकांची पदे भरण्यास परवानगी दिल्यानंतर जूनपर्यंत एकूण साडेपाच हजार रिक्त पदे भरली जातील, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी विधान परिषदेत केली.
दरम्यान, नव्या शैक्षणिक धोरणानंतर विद्यार्थिसंख्येत काही प्रमाणात घट झाली असून, कौशल्यविकासाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्याचा विषय भाजप आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मांडला होता. या चर्चेत भाजप गटनेते प्रवीण दरेकर, सत्यजित तांबे, मनीषा कायंदे, जयंत आसगावकर, अभिजित वंजारी यांनी भाग घेतला. राज्यातील अनुदानित महाविद्यालयांमधील रिक्त प्राध्यापकपदांच्या भरतीबाबत सरकारकडून प्रक्रिया सुरू असून, ती जूनपूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
सध्या राज्यात 31,185 मंजूर पदांपैकी 19,267 पदे भरलेली असून, 11,918 पदे रिक्त आहेत. यापैकी 5,012 पदे भरण्यास वित्त विभागाने परवानगी दिली आहे. त्यामुळे पूर्वीची 494 पदे मिळून सुमारे साडेपाच हजार पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे, असे पाटील यांनी सांगितले.
महाविद्यालयांच्या ‘नॅक’ मानांकन प्रक्रियेसाठी स्वतंत्र बजेट तरतूद करण्याची गरज नसून, हा खर्च नियमित स्वरूपात केला जातो, अशी माहिती मंत्री पाटील यांनी दिली. यासाठी केवळ वित्त विभागाची परवानगी आवश्यक असते. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान, राज्यातील ‘नॅक’ मानांकित महाविद्यालयांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, अशा महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे.
वित्त विभागाने भरतीसाठी 2025 मधील अद्ययावत विद्यार्थीसंख्या विचारात घेण्याचा आग्रह धरला आहे. त्यानुसार राज्यातील सुमारे 1,200 महाविद्यालयांचा कॉलेज-निहाय तक्ता तयार करण्यात येत असून त्यानुसार प्रत्येक महाविद्यालयाला किती पदे मिळणार याचे आदेश लवकरच काढले जाणार आहेत. जून पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा आपला आग्रह आहे, असेही मंत्री पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.