Maharashtra Polytechnic Admission 2025
मुंबई : तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत तंत्रनिकेतन पदविका (पॉलिटेक्निक) प्रथम वर्ष अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे. 16 जूनपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. या कालावधीत पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्ज, ऑनलाईन नोंदणी कागदपत्रांच्या स्कॅन, छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रे पडताळणी, अर्ज करणे ही प्रक्रिया करता येणार आहे.
गतवर्षी प्रमाणे यंदाही कागदपत्रांच्या प्रत्यक्ष छाननी प्रक्रिये व्यतिरिक्त ई-स्क्रूटनीची संकल्पना राबविण्यात येणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना ई-स्क्रूटनी पद्धत किंवा प्रत्यक्ष स्क्रूटनी पद्धत या दोन पर्यायांपैकी एक निवडावा लागणार आहे. ई-स्क्रूटनी पद्धतीत, विद्यार्थी संगणक किंवा स्मार्टफोनच्या माध्यमातून अर्ज भरू शकतात. आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील. अर्ज व दस्तऐवजांची पडताळणी सुविधा केंद्रांकडून ऑनलाईनच केली जाईल. तसेच प्रत्यक्ष स्क्रूटनी पद्धतीत, संगणक किंवा स्मार्टफोनची सुविधा नसलेल्या विद्यार्थ्यांनी जवळच्या सुविधा केंद्रावर जाऊन अर्ज भरावा लागेल. अर्ज सादर करताना मूळ कागदपत्रे बरोबर घेऊन जावीत आणि तीथेच पडताळणी करून अर्ज निश्चित केला जाणार आहे. पुढील कॅप फेर्यांचे वेळापत्रक अंतिम गुणवत्ता यादी नंतर जाहीर केले जाणार आहे.
विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरणे, त्यांचे समुपदेशन करणे, प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्प्यावर विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्यामध्ये सुविधा केंद्र असणार आहेत. सुविधा केंद्रांना उद्भवणार्या अडचणींचे निवारण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक नोडल अधिकारी नेमण्यात आले आहेत.
गेल्या वर्षी दहावी उतीर्ण विद्यार्थ्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि डेटा सायन्स यांसारख्या नवीन अभ्यासक्रमांना पसंती दिली होती. याबरोबरच कम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदविका करण्याकडेही अनेकांचा कल होता.
गतवर्षी 400हून अधिक असलेल्या पॉलिटेक्निक संस्थामध्ये 1 लाख 14 हजार 27 इतकी प्रवेश क्षमता होती. यापैकी तब्बल 95 हजार 248 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. गेल्या वर्षी प्रवेशाची संख्या तब्बल 9 हजारांनी वाढली होती.
यामध्ये सर्वाधिक 31 हजार 411 विद्यार्थ्यांनी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, आयटी आणि डेटा सायन्स आदी अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला होता. या अभ्यासक्रमांसाठी 34 हजार 221 जागा उपलब्ध होत्या. त्याशिवाय इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमांना पसंती दिली होती.
पॉलिटेक्निक प्रवेशाचे वेळापत्रक
ऑनलाईन नोंदणी, कागदपत्रांच्या स्कॅन
छायाप्रती अपलोड करणे -20 मे ते 16 जून
कागदपत्रांची पडताळणी, अर्ज भरल्याची निश्चिती (ई-स्क्रूटनी /प्रत्यक्ष स्क्रूटनी) -20 मे ते 16 जून
तात्पुरत्या गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे - 18 जून
तात्पुरत्या गुणवत्ता यादीसंदर्भात
हरकत सादर करणे -19 ते 21 जून
अंतिम गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे -23 जून
76691 00257 / 18003132164 (सकाळी 10 ते सायंकाळी 6)
प्रवेशाची लिंक
https: // poly25. dtemaharashtra.gov.in