

मालेगाव : येत्या शैक्षणिक वर्षांपासून राज्यातील शिक्षकही गणेवशात दिसणार असून, सर्व शालेय शिक्षकांना ड्रेसकोड लागू करण्यात येणार आहे. ड्रेसकोडसाठी खारीचा वाटा म्हणून शासननिधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सूतोवाच शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केले आहे.
मालेगाव तालुक्यातील अजंग येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना ओएनजीसी व अवंत फाउंडेशनच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीआरएस) अंतर्गत शैक्षणिक डेस्कसह शाळेच्या बॅगचे वितरण करण्यात आले. यावेळी मंत्री भुसे बोलत होते.
मंत्री भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात शाळेतील सर्वच शिक्षक गणवेशात असल्याने मंत्री भुसे यांनी शिक्षकांचे कौतुक करताना यापुढे राज्यभरातील शाळेय शिक्षकांना ड्रेसकोड लागू करण्याबाबत सुतोवाच केले. दरम्यान, विद्यार्थ्यांना दर्जेदार व आनंददायी शिक्षण मिळावे यासाठी शासन शिक्षण विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत आहेत. विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत उपस्थित राहून ज्ञानार्जन करावे, पालकांनी मुलांशी संवाद साधावा आणि शाळांनी सहलींसारखे उपक्रम राबवावेत, असेही मंत्री भुसे यांनी यावेळी आवाहन केले आहे.
दरम्यान, शिक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यावर अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघाचे संस्थापक साजिद निसार अहमद यांनी शिक्षकांच्या पगारासाठीचे बजेट सरकार वेळेवर देत नाही. वर्षानुवर्षे अंशतः अनुदान व विनाअनुदान तत्त्वावर शैक्षणिक सेवा बजावणारे शिक्षक अनुदानापासून वंचित आहेत. त्यामुळे सरकारने आधी शिक्षकांचे प्रमुख प्रश्न सोडवावे नंतरच गणवेशबाबत विचार करावा, अशी मागणी केली आहे.