नवी मुंबई, ठाण्यात सेना-भाजप युती धोक्यात? 
मुंबई

Maharashtra Politics : नवी मुंबई, ठाण्यात सेना-भाजप युती धोक्यात?

इच्छुकांना अर्जवाटप सुरू, 111 उमेदवारांची यादी तयार

पुढारी वृत्तसेवा

राजेंद्र पाटील

ठाणे/नवी मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील संघर्षामुळे नवी मुंबई आणि ठाणे महापालिकेसाठीची संभाव्य युती धोक्यात आली आहे. नवी मुंबईत शिवसेनेने ठाकरे शिवसेनेतील तसेच काँग्रेसमधील अनेक माजी नगरसेवकांना पक्षात प्रवेश दिल्यामुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास बळावला आहे. ही निवडणूक स्वबळावर लढण्याचा आग्रह त्यांनी पक्षाकडे केल्याने पक्षही स्वतंत्रपणे लढण्याच्या विचारात आहे, तर ठाण्यामध्ये शिवसेनेला झुकते माप द्या अशा दिल्लीहून आलेल्या निरोपामुळे भाजपचे पदाधिकारी नाराज झाले असून, शंभर प्रभागांच्या अध्यक्षांनी आम्हाला युती अमान्य असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे दोन्ही महापालिका निवडणुका हे दोन पक्ष स्वतंत्रपणे लढण्याच्या मन:स्थितीत आले आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील संघर्षामुळे भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी नवी मुंबई महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची तयारी केली आहे. आम्हाला युती नको, आम्ही स्वबळावर लढू या निर्णयाप्रत शिवसेना आल्याचे नवी मुंबईतील एका वरिष्ठ नेत्याने आपले नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले. दरम्यान, भाजपकडून 850 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण झाल्या, तर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने बुधवारी संध्याकाळपासून इच्छुक उमेदवारांना अर्जवाटप करण्यास सुरुवात केली. 28 प्रभागांत 111 उमेदवारांची यादी शिवसेनेने तयार केली आहे.

मंत्री नाईक यांनी शिंदेंच्या बालेकिल्ल्यात जनता दरबार घेतल्याने राजकीय ठिणगी पडली होती. नाईक यांनी ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीत खुलेआम जनता दरबार सुरूच ठेवला. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज झाले. त्यांनी नवी मुंबईत मुक्काम करून आपल्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. ऐरोली, तुर्भे, वाशी, नेरुळ, कोपरखैरणे, घणसोली, महापे, सानपाडा येथे शिवसेनेची ताकद आणखी वाढली आहे. उपनेते,जिल्हाप्रमुख यांनी एम. के. मढवी कुटुंब, डी.आर.पाटील यांचे बंधू चंद्रकांत पाटील यांचे कुटुंब, तुर्भेतील सुरेश कुलकर्णी यांचे कुटुंब, बेलापूर येथील पूनम पाटील, मिथुन पाटील यांचे कुटुंब, घणसोलीतील सौरभ शिंदे ( आमदार शशिकांत शिंदे यांचे पुतणे) कोपरखैरणे येथील अंकुश कदम, दिघा येथील यादव कुटुंब अशा माजी नगरसेवकांना पक्षप्रवेश देत शिवसेनेची ताकद वाढवली. यामुळेच स्वबळावर निवडणूक लढण्याचा शिवसेनेचा विचार बळावला.

महापालिका निवडणुक जाहीर होण्यापूर्वीच नवी मुंबईत स्थानिक पातळीवर भाजप आणि शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला होता. एकीकडे भाजपाचेच आमदार मंदा म्हात्रे आणि निवडणूक प्रमुख संजीव नाईक तर शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा उघडपणे महापालिका निवडणुक युती म्हणून लढणार असल्याचे सांगत असले, तरी यामागे दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी तयारी करत आहेत.

भाजपच्या तुल्यबळ उमेदवारासमोर शिवसेनेकडून तोडीसतोड उमेदवार दिला जाणार आहे.साम,दाम,दंड, भेद सर्वांचा वापर करुन भाजप आणि शिवसेनेकडून उमेदवार निवडून आणण्यासाठी व्यूहरचना आखली जात आहे. या व्यतिरिक्त माजी आमदार आणि गणेश नाईक यांचे सुपुत्र संदीप नाईक हे देखील महापालिकेत स्वतंत्र उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार असल्याचे समजते. तशी तयारी त्यांनी केली असून बेलापूर येथील कार्यालयात तशा भेटीगाठी घेतल्या जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT