ठळक मुद्दे
ठाण्याबाबत अंतिम निर्णय एकनाथ शिंदेंच घेणार
पिंपरी, पुणे महापालिकेत स्वबळावर लढणार?
जानेवारीत महापालिका निवडणूक होण्याची शक्यता
Maharashtra Local Body Election 2025 Latest News Mahayuti Alliance
मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत असून या निवडणुकीत महायुती होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. याबाबत आता मोठी अपडेट समोर आली असून राज्यात काही ठिकाणी महायुती होणार असून काही ठिकाणी सत्ताधारी बाकावरील तिन्ही पक्ष स्वबळावर रिंगणात उतरतील. महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात महायुतीचा निर्णय हा एकनाथ शिंदेकडे सोपवण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.
महाराष्ट्रात दिवाळी संपल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. डिसेंबरमध्ये जिल्हा परिषद तर जानेवारीत महापालिका निवडणुका होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर महायुती- महाविकास आघाडी होणार का याची उत्सुकता मतदारांमध्ये आहे. एकीकडे राज्यातील जनता दिवाळीचा सण साजरा करत असतानाच राजकीय नेत्यांमध्ये महायुती, महाविकास आघाडीबाबत खलबतं सुरू आहे.
पुढारी न्यूजला विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महायुतीने निवडणुकीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात काही ठिकाणी एकत्र तर काही ठिकाणी स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय झाल्याचे समजते. याची औपचारिक घोषणा कधी होणार हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
स्वबळावर लढणार पण निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र येणार?
मुंबई महापालिका निवडणुकीत महायुती म्हणजेच भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार आहेत. मात्र, ज्या ठिकाणी स्वबळावर लढणार तिथे निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र येण्याबाबतही ठरलं आहे. ‘स्वबळा’चा विरोधकांना फायदा होऊ नये यासाठी महायुतीने ही रणनीती आखल्याचे समजते.
ठाण्याबाबत एकनाथ शिंदेंच निर्णय घेणार
ठाणे जिल्हा हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला मानला जातो. ठाणे, कल्याण- डोंबिवली या महापालिकांमध्ये भाजप आणि शिंदेसेना अशा दोन्ही पक्षाचे स्थानिक नेते, पदाधिकारी स्वबळावर लढण्याची उघड भूमिका घेत आहे. या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ठाण्यात युती करण्याबाबतचे सर्वाधिकार एकनाथ शिंदेंना देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. पक्षातील नेत्यांनी एकमताने हा निर्णय घेतला.
ठाण्यात महायुती झाल्यास जागावाटपाच्या वेळी ठाण्यातील काही जागा मित्रपक्ष असलेल्या भाजपसाठी सोडाव्या लागतील आणि याचा फटका पक्षाला बसू शकतो. उमेदवारी न मिळालेले अनेक उमेदवार पुन्हा उद्धव ठाकरेंच्या पक्षात जातील अशी शक्यताही आहेच. यापार्श्वभूमीवर ठाण्यात युतीबाबतचे सर्वाधिकार एकनाथ शिंदेंना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.