मुंबई

Maha Walkathon 2026: राज्यभर जल अन् मृदा संवर्धनासाठी जागर; ‘महा वॉकेथॉन’मधून लोकचळवळीचा संकल्प

राज्यभर जल अन् मृदा संवर्धनासाठी जागर; ‘महा वॉकेथॉन’मधून लोकचळवळीचा संकल्प

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्रात जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी राज्यभर ‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’च्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. जलसंधारण दिनानिमित्त महाराष्ट्रभरात आयोजित या उपक्रमांना नागरिक, युवक, विद्यार्थी, महिला, अधिकारी-कर्मचारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’, ‘पाणी वाचवा’ आणि ‘माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा’ या संदेशातून भविष्यातील जलसुरक्षेसाठी प्रत्येकाने पाण्याचा एकही थेंब वाया जाऊ न देता त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प केला. जलसंधारण हा केवळ शासनाचा कार्यक्रम न राहता लोकसहभागातून त्याला व्यापक चळवळीचे स्वरूप देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

पाण्याचा वाहून जाणारा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या : पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव : पाण्याचा प्रश्न आता उद्याचा राहिलेला नसून तो आजचाच आहे. पाऊस किती आणि कधी पडेल हे आपल्या हातात नसले तरी पडलेले पाणी वाहून जाऊ न देता अडवणे व जमिनीत जिरवणे आपल्या हातात आहे. त्यामुळे जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

जलसंधारण दिनानिमित्त सागर पार्क येथे आयोजित ‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’च्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून वॉकेथॉनला सुरुवात झाली. यावेळी खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

‘पाणी अडवा, पाणी जिरवा आणि पाणी वाचवा’ हा संदेश गावागावात पोहोचवावा, असे आवाहन पाटील यांनी केले. शासनाने १५ ऑगस्ट ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत जलसंधारण अभियान राबविण्याचा निर्णय घेतला असून नाले, तलाव व पाझर तलावांची स्वच्छता आणि जलसंधारणाची कामे लोकसहभागातून करण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमात जलसंधारण व पाणी बचतीची शपथ देण्यात आली.

माती आणि पाण्याचे संवर्धन करावे : पालकमंत्री जयकुमार रावल

धुळे : माती आणि पाणी ही नैसर्गिक संपत्ती असून भविष्यातील पिढीसाठी त्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने पृथ्वीच्या संरक्षणासाठी माती आणि पाण्याचे रक्षण करावे, असे आवाहन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.

माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा क्रीडा संकुलात मृद व जलसंधारण विभागातर्फे ‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले. यावेळी रावल बोलत होते. महापौर मायादेवी परदेशी, आमदार राघवेंद्र पाटील, आमदार अनुप अग्रवाल, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, पोलिस अधीक्षक विशाल आनंद आदी उपस्थित होते. नागरिकांना जलसंवर्धनाची शपथ देण्यात आली.

जिल्ह्यात गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, जलयुक्त शिवार अभियान 2.0 आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना-पाणलोट विकास घटक 3.0 या योजनांतून जलसाठे निर्माण, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, गाळ काढणे, नाला खोलीकरण व मृदसंधारणाची कामे सुरू आहेत. जलसंधारणातून भविष्यातील जलसुरक्षेचा पाया मजबूत होत असून नागरिकांनीही या चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे रावल यांनी सांगितले.

‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’ला सिंधुदुर्गवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

संजय वालावलकर

ओरोस : जलसंधारण दिनानिमित्त सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित ‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा’ हा संदेश देण्यासाठी नागरिक, युवक, विद्यार्थी, महिला, अधिकारी-कर्मचारी व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले.

सकाळी ६ वाजता पोलीस परेड ग्राऊंडवर वॉकेथॉनला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सहभागीांना जलसंधारणाची शपथ दिली. भविष्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी पाणी बचतीचा संदेश सर्वदूर पोहोचविणे आवश्यक असून मृद व जलसंधारणासाठी जनजागृती गरजेची असल्याचे त्यांनी सांगितले.

वॉकेथॉनमध्ये वैभव नार्वेकर यांनी प्रथम क्रमांक मिळवत २५ हजार रुपये, वैभव वाघमोडे यांनी द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार रुपये, तर अभिजीत जेडयार यांनी तृतीय क्रमांकासाठी १० हजार रुपयांचे बक्षीस पटकावले. सात जणांची विशेष बक्षिसांसाठी निवड करून प्रत्येकी तीन हजार रुपये देण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT