मुंबई: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वर्षानुवर्षे कंत्राटी पद्धतीने आरोग्यसेवा देणाऱ्या राज्यातील १४ हजार ७४७ कर्मचाऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. दहा वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या पात्र कर्मचाऱ्यांसाठी समकक्ष वेतनश्रेणीतील अधिसंख्य पदे निर्माण करून त्यावर नियुक्ती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने २७ ऑक्टोबर रोजी जारी केला.
२५ जून २०२६ पर्यंत तांत्रिक खंड वगळून दहा वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कंत्राटी सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. एकवेळची विशेष बाब म्हणून हा निर्णय घेण्यात आला असून, त्यानुसार २५ जून २०२६ पासून अधिसंख्य पदे अस्तित्वात येणार आहेत.
या पदांवर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना संबंधित पदाच्या समकक्ष वेतनश्रेणीसह महागाई भत्ता आणि प्रवास भत्ता मिळणार आहे. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सध्या मिळणाऱ्या रजाही लागू राहतील. मात्र, पदोन्नती, आश्वासित प्रगती योजना आणि सेवानिवृत्ती तसेच कुटुंब निवृत्तीवेतनाचे लाभ मिळणार नाहीत.
राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण, दुर्गम तसेच शहरी भागांत आरोग्यसेवा पोहोचविण्यात या कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा आहे. माता-बाल आरोग्य, लसीकरण, संसर्गजन्य आजारांचे नियंत्रण आणि विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची जबाबदारी हे कर्मचारी सांभाळत आहेत. मात्र, दीर्घकाळ सेवा करूनही त्यांना कंत्राटी स्वरूपात काम करावे लागत होते. आता शासनाच्या निर्णयामुळे त्यांच्या वेतन आणि सेवाविषयक व्यवस्थेला आधार मिळणार आहे.