

राजेंद्र पाटील
नवी मुंबई : दिवाळीचा सण उंबरठ्यावर असतानाच फराळाचे पदार्थ बनवण्यासाठी महत्त्वाचा घटक असलेल्या खाद्यतेलाच्या दराने मोठी उसळी घेतली आहे. शेंगदाणा, सोयाबीन आणि तिळाच्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाली असून, शेंगदाण्याच्या तेलाने थेट २०० ते २५० रुपयांचा टप्पा गाठला आहे. सोयाबीन तेलही २०० रुपयांच्या उंबरठ्यावर असून, तिळाच्या तेलाचा दर तब्बल ३५० रुपये लिटरवर गेला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात पाम तेल आणि सोयाबीन तेलाच्या जागतिक किमतीत झालेली वाढ आणि आंतरराष्ट्रीय युद्धजन्य परिस्थिती, वाढलेला मालवाहतूक खर्च आणि डाॅलरचे दर ८५ रुपयांवरून ९५ रुपयांपर्यंत पोहोचले. यामुळे घाऊक बाजारातच खाद्यतेलाचे दर १५ ते २० टक्क्यांनी वाढले. किरकोळ बाजारात ही दरवाढ ३० टक्क्यांवर गेली आहे. त्यातच दिवाळीनंतर खाद्यतेल २५ टक्क्यांनी आणखी महागणार असल्याची माहिती अ. भा. खाद्यतेल संघटनेचे सचिव व घाऊक व्यापारी तरुण जैन यांनी दै. ‘पुढारी’ला दिली.
दरवाढीची कारणे
सोयाबीन उत्पादन भागात दुष्काळी परिस्थितीमुळे सोयाबीन, शेंगदाणा, तीळ, राई आणि सूर्यफूल पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेल्याने उत्पादन घटले आहे.
केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या आयात शुल्कात १५ टक्के कपात केली. त्याचवेळी डॉलरचा दर वधारला. याचा परिणाम खाद्यतेलाच्या दरावर झाला.
युद्धजन्य परिस्थिती, वाढलेला मालवाहतूक खर्च याचाही फटका खाद्यतेलाच्या किमतीला बसला.
खाद्यतेलाचे किरकोळ दर लिटरमध्ये (रुपयांत)
तीळ तेल : ३५०
शेंगदाणा तेल : २०० ते २५०
सोयाबीन तेल : १८५ ते १९५
सूर्यफूल तेल : २२०
पाम तेल : १८०
घाऊक बाजारातील दर (रुपयांत)
शेंगदाणा : २०० ते २२५
सोयाबीन : १४३ ते १४५
तीळ तेल : २२० ते २२५
सूर्यफूल : १७५ ते १७६
पाम तेल : १४३ ते १४५
देशात वर्षाला २५० लाख टन खाद्यतेलाचा वापर होतो. त्यापैकी १४० ते १५० टन तेलाची आयात होते. मलेशिया, अर्जेंटिना, इंडोनेशिया, युक्रेन, रशिया या देशांतून सोयाबीन, पाम तेल आयात केले जाते. तर, भारतातून १० ते १५ हजार मेट्रिक टन शेंगदाणा तेल निर्यात केले जाते.