मुंबई : नरेश कदम
राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपला नेत्रदीपक यश मिळाल्यामुळे राज्याच्या सत्तेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राजकीय पत घसरली आहे. भाजपच्या विजयी घोडदौडीमुळे शिवसेना-राष्ट्रवादीची पुरती कोंडी झाल्याचे एकंदरीत चित्र आहे.
राष्ट्रीय नेत्यांची छबी न वापरता फडणवीस यांनी, महापालिका निवडणुकीचे राजकारण स्वतः भोवती फिरू दिले. एकहाती भिंगरीसारखे पिंजून काढत महाराष्ट्राचे निर्विवाद नेतृत्व असल्याचे या निकालातून दाखवून दिले. त्यामुळे राज्याच्या सत्तेतही त्यांच्या पुढे कोणत्याही नेत्यांचे आव्हान त्यांना सध्या तरी दिसत नाही. या निवडणुकांत अजित पवार आणि एकनाथ शिंदे सरस ठरले असते तर सत्ता चालविताना त्यांची डोकेदुखी वाढली असती; पण आता शिंदे यांची डोकेदुखी वाढली आहे. शिंदे यांना ठाणे जिल्ह्यातील महापालिकांमध्ये भाजपने घेरले होते; तर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांत भाजपने अजित पवार यांना घेरले होते. त्यात निकाल भाजपच्या बाजूने लागले. त्यामुळे या दोघांची राजकीय कोंडी झाली आहे.
मुंबईत ठाकरे बंधूंना तर पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेत पवार बँडला चित करून दाखविले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक प्रतिष्ठेची बनविलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार हे चांगलेच आपटले असून, काकांना सोबत घेऊनही त्यांना यश न मिळाल्यामुळे, अजित पवार यांची राज्याच्या सत्तेतल्या ‘दादागिरी’ला वेसण बसेल. शहरी भागात अजित पवार यांचे नेतृत्व स्वीकारले जात नाही, त्यामुळे हा त्यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे. काकांना सोबत घेऊनही त्यांचा फडणवीस यांच्यापुढे टिकाव लागला नाही. त्यामुळे भविष्यात भाजपसोबत सत्तेत राहायचे असेल, तर अजित पवार यांना फडणवीस यांच्याशी जुळवून घ्यावे लागेल. सत्तेत की विरोधात याबाबत स्पष्ट भूमिका त्यांना घ्यावी लागेल. फडणवीस यांच्या चतुर रणनीतीत अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघीही अडकले.
महायुतीत आपसात कुस्ती खेळण्याच्या नादात पवार आणि शिंदे यांचे उपद्रवमूल्य ही संपले. कारण, निकालात भाजपला आकडे असे आले आहेत की, या दोघांच्या पाठिंब्याची फारसी गरज उरलेली नाही. त्यात मुंबईसह महापालिकांत सत्तेसाठी सुरू असलेले शिंदे यांचे दबावतंत्र झुगारून टाकण्याचे फडणवीस यांनी ठरविले आहे.
एकनाथ शिंदे यांनी भाजपला नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पुणे आदी महापालिकांत आव्हान दिले होते. मुंबईतही जास्त जागा लढवून त्यांना भाजपच्या तुलनेत यश मिळाले नाही. त्यामुळे राज्याच्या सत्तेतील त्यांचा आवाज थोडा क्षीण होईल. त्यामुळे त्यांना भाजपसोबत फरफटत जावे लागेल. अजित पवार यांना भाजप कळली आहे. त्यामुळे ते दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र करून पुढील राजकारण करतील; पण शिंदे यांच्या दोऱ्या भाजपच्या हाती आहेत, त्यामुळे त्यांना जपून पावले टाकावी लागतील.