

Amit Thackeray Targets Maharashtra Resort Politics: महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लोकप्रतिनिधींनी आपल्या प्रभागात जाऊन नागरिकांचे आभार मानायला हवेत, तसेच जनतेच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य द्यायला हवे. मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळेच दिसत असल्याचे म्हणत मनसे नेते अमित ठाकरे यांनी नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.
अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, जनतेने निवडून दिलेले नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी आज त्यांच्या प्रभागात दिसत नाहीत. उलट ते फाईव्ह स्टार हॉटेलच्या बंद दाराआड ‘आनंदाने’ कैद आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
अमित ठाकरे यांनी या प्रकारामागे नेमकं कारण काय, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
“स्वतःच्याच सहकाऱ्यांवरचा अविश्वास आहे का? की स्वार्थी राजकारण?” असा प्रश्न विचारत त्यांनी सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर नाराजी व्यक्त केली.
त्यांनी असेही म्हटले की, या राजकीय ‘पळवापळवी’मध्ये मतदान करणाऱ्या सामान्य नागरिकांचा अपमान होतो. “महाराष्ट्राचं राजकारण किती खाली घसरणार आहे?” असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी सध्याच्या राजकारणावर संताप व्यक्त केला.
अमित ठाकरे यांनी या सगळ्या राजकीय गदारोळाचा फटका पर्यटकांनाही बसत असल्याचे सांगितले. अनेक पर्यटकांनी आपल्या कष्टाचे पैसे खर्च करून हॉटेल बुकिंग केले असताना, सुरक्षेच्या नावाखाली त्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
याचबरोबर लोकांच्या हितापेक्षा स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी सुरू असलेला हा तमाशा आणि जनतेच्या पैशाची उधळपट्टी थांबवा, अशी टीका त्यांनी केली.
पोस्टच्या शेवटी अमित ठाकरे यांनी उपरोधिक शब्दांत लोकप्रतिनिधींना टोला लगावत म्हटले आहे की, “जमल्यास… ज्या जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवलाय तिच्यासाठी काहीतरी करा.” अमित ठाकरे यांच्या या पोस्टनंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.