

नवी मुंबई : मालमत्ता कर व्यवस्थेमध्ये नवी मुंबई महापालिकेने राबविलेल्या व्यापक सुधारणा आणि नागरिक-केंद्रित डिजिटल प्रशासन उपक्रमासाठी देशातील प्रतिष्ठेचा ‘स्कॉच पुरस्कार 2025’ नवी दिल्ली येथे 104 व्या स्कॉच शिखर परिषदेत सोमवारी महापालिकेला प्रदान करण्यात आला.
महापालिकेच्या वतीने हा पुरस्कार अतिरिक्त आयुक्त सुनील पवार आणि मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त डॉ. अमोल पालवे यांनी स्कॉच डेव्हलपमेंट फाऊंडेशनचे अध्यक्ष समीर कोच्छर यांच्या हस्ते स्विकारला.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचा हा देशपातळीवर झालेला गौरव आहे. कर संकलनात ऐतिहासिक वाढ झाली आहे. मालमत्ता कर सुधारणा उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर आर्थिक वर्ष 202526 मध्ये एकूण 478.35 कोटींचे मालमत्ता कर संकलन नोंदविण्यात आले आहे. यामध्ये 1 लाख 59 हजार 425 मालमत्तांकडून कर भरणा, चालू कर संकलन 427.20 कोटी, थकबाकी कर संकलन 51.15 कोटी, ऑनलाईन कर भरण्यात सुमारे चारपट वाढ, अशी कामगिरी साध्य झाली आहे.