मिनी विधानसभा असलेल्या राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीत उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, गणेश नाईक, गिरीश महाजन, अतुल सावे अशा अनेक मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तसेच सतेज पाटील, अमित देशमुख, हितेंद्र ठाकूर, विश्वजित कदम, यशोमती ठाकूर अशा विरोधी पक्षातील अनेक नेत्यांची कसोटी लागेल.
राज्यातील 29 महापालिकांमध्ये 150 हून अधिक विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामुळे ही एक प्रकारे मिनी विधानसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीत प्रचाराची कोणतीही कसर एकाही पक्षाने सोडलेली नाही. मुंबईत 20 वर्षांनंतर एकत्र आलेले ठाकरे बंधू व त्यांना टक्कर देणारी भाजप-शिंदे सेना महायुती असा सामना आहे. काँग्रेस स्वतंत्र लढत आहे. पण, 25 वर्षे मुंबई महापालिकेत असलेली सत्ता ते कायम राखणार की त्यांच्या हातातून सत्ता निसटणार, हे पाहणे महत्त्वाचे असेल. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची असेल.
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई या महापालिकांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कसोटी आहे. याबरोबर कल्याण डोंबिवलीत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी, तर नवी मुंबईत मंत्री गणेश नाईक यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले आहे. मीरा-भाईंदरमध्ये प्रताप सरनाईक विरुद्ध आमदार नरेंद्र मेहता, तर वसई विरार मध्ये बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूरसह काँग्रेस, ठाकरे गट त्यांच्या साथीला आहेत; पण भाजपचे कडवे आव्हान आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुक्काम ठोकून आहेत. दोन्ही ठिकाणी शिंदे गट वेगळा लढत आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध अजित पवार अशी झुंज आहे. नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांची कसोटी आहे. तेथे ठाकरे बंधूंचे आव्हान आहे. जळगाव महापालिकेत महायुती एकसंघ लढत आहे; तर धुळे महापालिकेत भाजपला महायुतीतील अजित पवार गट आणि शिंदे गट यांचे आव्हान आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे मंत्री अतुल सावे, शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांची कसोटी आहे. जालन्यात भाजपचे रावसाहेब दानवे आणि शिंदे गटाचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांची प्रतिष्ठा पणाला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतरची नांदेड महापालिकेची ही पहिली निवडणूक आहे. लातूरमध्ये अमित देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अकोला महापालिकेत भाजप आणि अजित पवार गट यांची युती आहे. वंचित वेगळी लढत आहे; तर ठाकरे बंधू यांची युती आहे.
नागपूर महापालिकेत भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.