

मुंबई : गौरीशंकर घाळे
मुंबईतील उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात राज्यातील सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महापालिकेच्या 39 जागांसाठी येथे लढत होत असून, उद्धव सेना, शिंदे सेनेसह भाजप, काँग्रेस आणि एमआयएम या सर्व पक्षांची या भागातील कामगिरी निर्णायक ठरणार आहे. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान याच मतदारसंघाचा भाग आहे. त्यामुळे येथील सर्व लढतींना विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ हा लोकसभा निवडणुकीपासून चर्चेत आला आहे. भाजपचे उज्ज्वल निकम आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या लक्षवेधी लढतीत महाविकास आघाडीची सरशी झाली. मराठी, मुस्लिम आणि दलित मतांच्या जोरावर इथे मविआच्या माध्यमातून काँग्रेसचा झेंडा फडकला. यंदा महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग नाही. ठाकरे बंधू विरूद्ध महायुतीच्या लढतीत काँग्रेस आणि वंचित तिसरी आघाडी म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळे या भागातील विविध धार्मिक, जातीय गटाची मांडणी कशी होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
या निवडणुका महापालिकेच्या असल्या तरी महाराष्ट्राच्या व मुंबईच्या राजकारणातील महत्त्वाच्या राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ठाकरेंचे निवासस्थान ‘मातोश्री’ इथे आहे. मागील निवडणुकीत पक्षाला इथे 14 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे ठाकरे गट आणि आता युती झाल्यामुळे सोबत असलेल्या मनसेसाठी इथले निकाल महत्वाचे आहेत. वांद्रे पुर्वेत वरूण सरदेसाई हे आमदार आहेत. तर, ठाकरेंचे शिलेदार अनिल परब यांचाही या भागातील राजकारणावर पगडा होता. यंदाच्या तिकिटवाटपात परब विरूद्ध सरदेसाई संघर्ष झाल्याच्या चर्चा आहेत. दोन्ही बाजूने समर्थकांसाठी आग्रह झाला. त्यामुळे इथले निकाल या दोन्ही नेत्यांच्या पुढील वाटचालीच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहेत.
तर, भाजपचे मंत्री आणि मुंबई निवडणुक प्रभारी आशिष शेलार हे वांद्रे पश्विमेचे आमदार आहेत. या लोकसभा क्षेत्रातील भाजपची संख्या वाढवायची असेल तर शेलारांच्या मतदारसंघातील नगरसेवकांची संख्या वाढणे गरजेचे आहे. पाठोपाठ विलेपार्ल्यातील भाजप आमदार पराग अळवणी यांच्यावरही चांगल्या कामगिरीचा दबाव असणार आहे. तर, वर्षा गायकवाड या येथील काँग्रेस खासदार आणि पक्षाच्या मुंबई अध्यक्षा आहेत. त्यामुळे काँग्रेसचे अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. विशेषतः माजी मंत्री आणि काँग्रेस नेते नसीम खान यांच्यातील स्पर्धा पुढे कोणते वळण घेते, हे पाहावे लागणार आहे. एकूणच पालिका निवडणुकांच्या निमित्ताने मुंबई आणि राज्य पातळीवर राजकारण करर्ण़ाया नेत्यांची प्रतिष्ठा मात्र पणाला लागली आहे.
मुंबईतील सर्वाधिक गुंतागुंतीचा, वैविध्यपूर्ण आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील असा हा भाग मानला जातो. एकाच मतदारसंघात झोपडपट्टी, मध्यमवर्गीय वसाहती, उच्चभ्रू टोलेजंग इमारती, बॉलीवूड सिनेतारकांचे बंगले असे वैविध्य या भागात आहे. तर, मराठी, मुस्लिम-बहुल भाग, ख्रिश्चन वस्त्या, गुजराती-उत्तर भारतीय वस्त्या, अशी सरमिसळ इथे दिसते. त्यामुळे पालिका निवडणुकीत येथे एकसुरी निकाल अपेक्षित न राहता, जवळपास प्रत्येक प्रभागात अटीतटीची लढत पाहायला मिळते. पाणी, रस्ते, ड्रेनेज, वाहतूक कोंडी, पूर नियंत्रण, प्रदूषण आणि झोपडपट्टी पुनर्वसन हे मुद्दे मतदानावर थेट परिणाम करणारे ठरत आहेत.